Mon, Aug 03, 2020 15:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वन अबव्हच्या दोन व्यवस्थापकांना अटक

वन अबव्हच्या दोन व्यवस्थापकांना अटक

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:37AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी वन अबव्हच्या दोन व्यवस्थापकांना रविवारी रात्री अटक केली. केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज अशी अटक आरोपींची नावे असून त्या रात्री लागलेली आग मोजोस बिस्त्रोमध्ये लागल्याचा दावा या दोघांनीही केला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस दोघांकडेही कसून चौकशी करत आहेत. 

आगीप्रकरणी केलेल्या प्राथमिक तपासात ही आग वन अबव्ह हॉटेलच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी या हॉटेलच्या मालकांसह व्यवस्थापक, संचालक आणि अन्य जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती बावा आणि लोपेज यांना अटक करण्यात आली. मात्र दोघांनीही ही आग मोजोस बिस्त्रोमध्ये लागली आणि तेथून ही आग पसरत आपल्या हॉटेलपर्यंत आली. आगीत अडकलेल्या ग्राहकांनाही आपण वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा हे दोन्ही आरोपी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कसून चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी भोईवाडा न्यायालयात केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत दोघांनाही 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हॉटेलचे मालक संघवी बंधूंना आश्रय देऊन पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये माझगाव परिसरात राहात असलेल्या काका राकेश संघवी यांच्यासह आदित्य संघवी यांना अटक केल्यानंतर रविवारी रात्री भायखळा पोलिसांनी गुन्ह्यातील तीसरा आरोपी महेंद्रकुमार संघवी याला अटक केली. शिवडी न्यायालयाने महेंद्रकुमार यांची जामिनावर सुटका केली आहे.