Fri, Dec 04, 2020 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहा लाख अन्य भाषिक विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार मराठीचे धडे !

दहा लाख अन्य भाषिक विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार मराठीचे धडे !

Last Updated: Feb 22 2020 1:53AM
मुंबई ः पवन होन्याळकर
येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय बोर्डासह राज्य शासनाच्या मराठी व्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आल्याने केंद्रीय बोर्डात शिकत असलेल्या तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना मराठीचे धडे गिरवावे लागणार आहेत. मात्र पहिली ते दहावीपर्यंच्या विद्यार्थ्यांना नेमके कुठून मराठी शिकवावे, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नसल्याने शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय नुकताच सरकारने घोषित केला. विधिमंडळाच्या  अर्थसंकल्पीय अधिवेशान तसा कायदाही केला जाणार आहे. महाराष्ट्रात मराठी व्यतिरिक्त विविध 13 भाषांच्या शाळांचा समावेश आहे. राज्यातील शाळांची संख्या 1 लाख 10 हजार असून, त्यात 87 हजार मराठी शाळा आहेत. इंग्रजी माध्यमांच्या 15 हजार तर उर्दू विभागाच्या 5 हजारांहून अधिक शाळा आहेत. हिंदी भाषेतील 1800, कन्नडमधील 336, गुजराती 249, तेलगू 57, बंगाली 55, तमिळ 39, सिंधी 19 शाळा आदी 13 भाषांतील सुमारे 23 हजार शाळांत मराठी भाषा शिकवली जात नाही. राज्यभरात आयसीएसई, सीबीएसई आणि आयबी अशा केंद्रीय बोर्डाच्या मिळून तब्बल 1 हजार 290 शाळा आहेत. त्या शाळात 11 लाख 38 हजार विद्यार्थी शिकत आहेत. तर 517 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांत 5 लाख विद्यार्थी शिकत आहेत. माध्यमिक शाळांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांपैकी काही शाळांत मराठी विषय शिकवला जात असल्याने या सर्व शाळांत सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकावा लागेल असा एक सूर आहे. पहिल्या टप्प्यात पहिली ते पाचवी आणि त्यानंतर सहावी ते दहावी अशा टप्  प्यात मराठी भाषा शिकवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.