नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
'एक देश, एक निवडणूक' हा केवळ विचारविमर्श करण्याचा विषय राहिलेला नसून ती काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.२६) संविधान दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले. केवडिया येथे ८० वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलन होत असून त्याच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान बोलत होते.
वारंवार होणाऱ्या निवडणुका विकासकार्यात बाधा आणतात, हे लक्षात घेता एक देश-एक निवडणूक या विषयावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, लोकसभा, विधानसभा तसेच इतर निवडणुकांमध्ये केवळ एका मतदार यादीचा उपयोग करणे आवश्यक आहे. मतदार याद्यांवर आपण इतका पैसा व वेळ का खर्च करतो, हे लक्षात येत नाही.
कायद्याच्या मुद्द्यांवरही पंतप्रधान मोदी यांनी आपले मत व्यक्त केले. कायद्याची भाषा सर्वसामान्य माणसाला समजेल, अशी साधी व सरळ असली पाहिजे. ही घटना आपण भारतवासीयांनी आपल्या स्वतःला दिलेली आहे. काळानुसार ज्या कायद्यांचे महत्त्व संपलेले आहे, असे कायदे कालबाह्य करण्याची प्रक्रिया सोपी असली पाहिजे. केंद्रात रालोआ सरकार सत्तेत आल्यापासून असे असंख्य कायदे कालबाह्य करण्यात आलेले आहेत.