मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात बहुमत मिळूनही शिवसेनेशी निर्माण झालेल्या संघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास अपयश आल्याने आता सत्तास्थापनेची सूत्रे ही भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे गेली आहेत. युतीत टोकाचे मतभेद निर्माण झाले असले, तरी दोन्ही पक्षांनी युती तोडण्याची घोषणा केलेली नाही. राज्यातील सत्ता टिकविण्याठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून हालचाली केल्या जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने निवडणूकपूर्व युती करूनही मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादातून सरकार स्थापन करण्यात अपयश आले. मुदतीत सरकार स्थापन न झाल्याने राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. मात्र, त्यांनी जे कोणते सरकार स्थापन होईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच होईल, असा दावा केला आहे. तर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता समीकरण जुळवून आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, अजूनही दोन्ही पक्षांनी पाठिंब्याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.
राज्यात निर्माण झालेल्या या सत्तासंकटातून मार्ग काढण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिवसेनेसोबत चर्चा करून तिढा सोडविण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांना त्यामध्ये यश आले नाही. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध ताणले गेल्याने आता दोघांमध्ये चर्चा होणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता दिल्लीतूनच सूत्रे हलविली जाणार आहेत. आयोध्या निकाल पाहता देशात कायदा व सुव्यवस्थेला सध्या केेंद्राचे प्राधान्य आहे. मात्र, पुढच्या आठवड्यात मोदी आणि शहा यांच्याकडून महाराष्ट्रातील सत्ता राखण्यासाठी हालचाली सुरू केल्या जातील.
2014 च्या निवडणुकीनंतर भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. त्यावेळी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मिळाली होती. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ लाभली नाही तर भाजपशिवाय सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न फसणार आहेत. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहील, तर विरोधकांचीही मदत घेण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे.