Fri, Sep 18, 2020 23:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सागरी मार्गावर बोट अँम्बुलन्स सेवा

आता सागरी मार्गावर बोट अँम्बुलन्स सेवा

Last Updated: Aug 10 2020 1:24AM
अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

सन 2019-20 च्या पुरवणी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये वचनबद्ध ठेवलेल्या अनुदानातून मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बोट अँम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. 

याबाबतचा शासन निर्णय दि.7 ऑगस्ट 2020 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विशेष आभार मानले आहेत.

ही बोट अँम्बुलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे. मेडीकल युनिटसाठी लागणारी बोट, यंत्रसामुग्री, औषधे, कर्मचारीवर्ग, इंधन खर्च हे सर्व खर्च नेमण्यात येणार्‍या बाह्य यंत्रणेकडून करण्यात येतील. काम सुरू झाल्यावर प्रति महिना परिचालन खर्चाचे देयक या बाह्य यंत्रणेस शासनाकडून अदा करण्यात येईल. बाह्य यंत्रणेची सेवा घेण्याबाबतचे दर निविदा प्रक्रियेअंती निश्चित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

 "