Wed, Dec 11, 2019 20:42



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरे कारशेड शिवाय काणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही : उध्दव ठाकरे

आरे कारशेड शिवाय काणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही : उध्दव ठाकरे

Last Updated: Dec 03 2019 9:00PM




मुंबई : विशेष प्रतिनिधी

आरे कारशेड शिवाय राज्यातील कोणत्याही विकास कामाला स्थगिती दिलेली नाही. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामे थांबवणार नाहीत फक्त उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणार्‍या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

विकास कामे गतीने करण्यासाठी आढावा - जयंत पाटील

महाराष्ट्रातील सुरू असलेली विकासकामे गतीने करण्यासाठी पुर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी विविध विकास कामांचा आढावा घेतला जातोय. त्या आढाव्याचीच आज बैठक झाली. फक्त कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती दिलेली नाही, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.