Wed, Dec 11, 2019 18:50



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आरे कारशेड’शिवाय कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही

‘आरे कारशेड’शिवाय कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही

Last Updated: Dec 04 2019 12:48AM




मुंबई : विशेष प्रतिनिधी

आरे कारशेडशिवाय राज्यातील कोणत्याही विकासकामाला स्थगिती दिलेली नाही. राज्यात सुरू असलेली पायाभूत सुविधांची विकासकामे थांबवणार नाहीत. फक्त उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात  मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करिर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकासकामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र, उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ, या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांची विकासकामे थांबवणार नाहीत. कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केले जाते. मात्र, कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणेही आवश्यक आहे. 

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणार्‍या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच, विकासकामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढवून घेतोय का? याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जीवनातदेखील समृद्धी आली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, ‘एमटीएचएल’ या कामांबद्दलचे सादरीकरण करण्यात आले.

विकासकामे गतीने करण्यासाठी आढावा : जयंत पाटील

महाराष्ट्रातील सुरू असलेली विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी विविध विकासकामांचा आढावा घेतला जात आहे. त्या आढाव्याचीच आज बैठक झाली. फक्त कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.