Thu, Nov 26, 2020 19:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर प्रवेश नाही

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर प्रवेश नाही

Last Updated: Nov 22 2020 2:33AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी होणार्‍या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाची महामारी तसेच आगामी काही दिवसांत कोरोनाच्या संभाव्य दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी यासंदर्भातील कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण केले जाणार आहे.

दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. महापरिनिर्वाण दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी शिवाजी पार्क व रेल्वेस्थानके या ठिकाणी महापालिकेतर्फे अनुयायांसाठी विशेष व्यवस्था केली जाते. मात्र कोरोना महामारीमुळे यंदा अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. देशाच्या इतर भागातून येथे अनुयायी येत असल्याने कोरोनाचा फैलाव होवून दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे असले तरी या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व कार्यक्रमाच्या ऑनलाईन प्रसारणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍याने दिली.
या दिवशी नागरिकांनी घरी राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन आदरांजली अर्पण करावी, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

आंबेडकरी अनुयायींना चैत्यभूमीवर न येण्याचे बौद्ध महासभेचे आवाहन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी 1 ते 6 डिसेंबर रोजी देशभरातून लाखों भीम अनुयायी व जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट आले आहे ते अद्याप टळले नाही, याचे गांभीर्य लक्षात घेऊन आनुयायींना चैत्यभूमीवर न येण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेकडून करण्यात आले.

चैत्यभूमी येथे न येता, आपल्या स्थानिक ठिकाणी असलेल्या शहर, गाव, वार्ड, परिसर, बुद्ध विहार, स्मारक  इत्यादी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.