पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प असणार्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधर या मार्गावरील चाचणी बुधवारी यशस्वी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.
बेलापूर ते पेंधरदरम्यानच्या 11.10 कि.मी.च्या मार्गावर सिडकोतर्फे 11 मेट्रो स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रो एकूण 26.26 किमीचा असून चार मार्गिकांचा आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 8 हजार 904 कोटी रूपये करण्यात आला आहे. तर एकूण चार मार्गापैकी 11.10 किमी लांबीचा मार्ग उभारणे आणि 11 स्थानके बांधण्यासाठी 3063 कोटी रूपये खर्च आला आहे.
या मेट्रो मार्गावर एकूण 21 उन्नत स्थानके आणि एक डेपो वर्कशॉपचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एमएमआरडीएमार्फत कल्याण-तळोजा मार्ग प्रस्तावित आहे. नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत तळोजा पाचानंद येथे अंदाजे 20 हेक्टर जागेवर मेट्रो डेपो कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये रेल्वेचे निगराणीचे काम, परिचलन नियंत्रण कक्ष, रेल्वे स्वछता केंद्र तसेच रेल्वे गाडी विसावा जागा, छाननी कक्ष, प्रशिक्षण केंद्र सुविधा इत्यादीचा समावेश आहे.