Sun, May 26, 2019 14:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाला जिजाऊंचे नाव!

मुंबई विद्यापीठाला जिजाऊंचे नाव!

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी 

उत्तर महाराष्ट्र, पुणे व सोलापूर विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ असे नामकरण करण्यात यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला जून महिन्यात होणार्‍या पालिका सभागृहात मंजुरी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

हिंदवी स्वराजाची कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम, न्यायप्रियता अशा सात्विक गुणांचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांनी पाजले. या थोर माऊलीचे यथोचित स्मरण होण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ असे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केली आहे. ही मागणी शिवसेनेने उचलून धरली असून याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे राजमाता जिजाऊ भोसले नामकरण करण्यात यावे, अशी ठरावाची सूचना नरवणकर यांनी पालिका सभागृहात मांडली आहे. 

जूनमध्ये ही सूचना पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. विद्यापीठाच्या नामकरणाचा ठराव पालिका सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर तो राज्य शासनाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाचे नामकरण करण्याचे सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून राहणार आहे. मात्र राजमाता जिजाऊंच्या नावाला भाजपाकडून विरोध करण्याचा प्रश्नच नसल्याचे भाजपाच्या एका नेत्याने स्पष्ट केले. काँग्रेसनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे नामकरण होणार हे निश्‍चित असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.