Thu, Jan 21, 2021 15:55
नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीने बजावला समन्स

Last Updated: Jan 13 2021 12:44PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबईतील हायप्रोफाईल हस्ती आणि त्यांना ड्रग्ज पुरविणारे एनसीबीच्या रडारवर आले आहेत. काल मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता हे प्रकरण थेट महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जावयापर्यंत पोहचले आहे. एनसीबीकडून मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स बजावण्यात (NCP minister Nawab Malik’s son-in-law summoned in Muchhad Paanwala drugs case) आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, समीर यांनी २०० किलो ड्रग्जमधील मुख्य आरोपी करन सजनानी यांच्यात २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. दोघांमध्ये गुगल पे वरून व्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग्ज खरेदी-विक्री झाल्याचा संशय आहे. या चौकशीसाठी समीर खानला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीच्या रडावर अनेक लोक आहेत. मंगळवारी प्रसिद्ध मुच्छड पानवाला रामकुमार तिवारीला अटक करण्यात आली होती. एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत नवाब मलिकांच्या जावयाचे नाव उघड झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उ़डण्याची शक्यता आहे.