Fri, Jul 03, 2020 15:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'ऑफर'बाबत सुप्रिया सुळे म्हणतात, बॉस इज ऑलवेज राईट!

'ऑफर'बाबत सुप्रिया सुळे म्हणतात, बॉस इज ऑलवेज राईट!

Last Updated: Dec 03 2019 5:31PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनाही केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर होती असेही सांगितले. या मुलाखतीबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना 'शरद पवार आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट!' असे वक्तव्य केले. 

शरद पवारांनी काल दिलेल्या मुलाखतीत मोदी-पवार भेटीबाबत केलेल्या खळबळजनक खुलास्याबाबत त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, 'मी त्या बैठकीला उपस्थित नव्हते. ही बैठक दोन मोठ्या नेत्यांमध्ये झाली. पंतप्रधानांची ही उदारताच आहे त्यांनी ऑफर दिली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वैचारिक मतभेदांपेक्षा वैयक्तीक संबध फार महत्वाचे असतात. तुम्ही कालच्या मुलाखतीमध्ये ऐकलेच आहे की, त्यांनी पंतप्रधानांच्या ऑफरला आदरपूर्वक नकार दिल्याचे सांगितले आहे. 

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'पवार साहेब हे फक्त माझे वडील नाहीत, तर ते माझे बॉसही आहेत, आणि तुम्हाला माहित आहेच बॉस इज ऑलवेज राईट!'

अजित पवारांच्या बंडानंतरही त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत सुप्रिया सुळेंना 
विचारले असता, अजित पवारांबाबत पक्ष निर्णय घेईल सुळे यांनी सांगितले. 

आमदारांच्या शपथविधीच्या दिवशी अजित पवारांचे सुळेंनी जोरदार स्वागत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याबाबत सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या, 'पहिल्यांदा तो माझा मोठा भाऊ आहे. मला पाच भाऊ आहेत त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा तो भाऊ आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. जर माझ्या मुलाने चूक केली तर मला त्याचे कान धरण्याचा अधिकार आहे. पण, अजितदादा मोठा आहे. त्याला माझा कान धरण्याचा अधिकार आहे.'

सुळे यांनी आपल्या व्हॉट्स अॅप स्टेटसबाबतही सांगितले. त्या म्हणाल्या की, ज्यावेळी अजित पवारांनी बंडखोरी केली त्यावेळी त्यांना धक्का बसला त्यामुळे त्यांनी पार्टी अँड फॅमेली स्प्लिट असा स्टेटस ठेवला. 

आता अजित पवारांना त्यांनी माफ केले का असे विचारले असता त्यांनी 'कुटुंब जर एकमेकांच्या मागे उभे राहणार नाही तर कोण राहणार? ते एक वाईट स्वप्न होते. ज्यावेळी तुम्ही डोळे उघडले त्यावेळी ते स्वप्न विरुन गेले, से म्हणत सर्व प्रकरणावर पडदा टाकला.