Mon, Aug 10, 2020 05:09



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कोरोनाशी लढाई एकांगी नको, पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घ्यावे'

'कोरोनाशी लढाई एकांगी नको'

Last Updated: Jul 09 2020 3:01PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई : पुढारी ऑनलाईन

ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता.9) सांगितले. त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला व महत्वाच्या सूचना केल्या. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सुचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल अशी मला खात्री आहे. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही पण आता कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे. त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. आपण पुढे काही करण्याचा आता दररोज रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते.

मुंबईसारख्या मोठ्या सुविधा उभारा

मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सुचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची देखील मदत घ्या. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोख्ण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले. यावेळी विविध पालिका आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.विभागीय आयुक्त लोकेश चंद्र यांनी देखील आपल्या सुचना केल्या.