Tue, Oct 20, 2020 11:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिटणीसांचे सत्ताधारी शिवसेनेला झुकते माप

चिटणीसांचे सत्ताधारी शिवसेनेला झुकते माप

Last Updated: Oct 18 2020 1:06AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चिटणीसांनी शिवसेनेला झुकते माप दिले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या मुलुंड टी आणि भांडुप एस प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला समसमान मते पडली असताना, एक मत अवैध ठरवत, शिवसेना उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. यासाठी मतपत्रिकाच गायब केल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील महाआघाडी तसेच काँग्रेसचा छुपा पाठिंबा, यामुळे प्रभाग समिती निवडणुकीत भाजपला चार प्रभाग समिती गमवाव्या लागल्या. 17 समित्यांपैकी शिवसेनेने 12, तर भाजपने 5 समित्यांवर विजय मिळवला आहे. शुक्रवार 16 ऑक्टोबरला झालेल्या भांडुप व मुलुंड येथील एस आणि टी प्रभाग समितीच्या निवडणुकीत जोरदार राजकारण रंगले. या निवडणुकीत शिवसेनेच्या दीपमाला बढे यांना 10, तर भाजपच्या जागृती पाटील यांना 10 मते पडली होती. मात्र भाजपचे एक मत अवैध ठरवून शिवसेनेच्या बढे यांना विजयी घोषित करण्यात आले. उमेदवाराच्या समोर नमूद केलेल्या जागेच्या बाहेर अवघा पाच टक्के सहीचा भाग गेल्यामुळे हे मत अवैध ठरवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या निवडणूक प्रक्रियेवर भाजपचे मनोज कोटक, प्रभाकर शिंदे व प्रकाश गंगाधरे यांनी हरकत घेतली आहे. दोन्ही उमेदवारांना समसमान दहा मते पडली होती, असा दावा शिंदे यांनी केला आहे. बाद झालेली मतपत्रिका दाखवण्याचा आग्रह भाजपने धरला. परंतु, पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याकडे दुर्लक्ष करत शिवसेना उमेदवाराला विजयी घोषित केले. 

सभागृहातून मतपत्रिका गायब केली. पालिका चिटणीस यांच्या संगनमताने हे नाट्य घडल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. महापौरांच्या एकतर्फी वागण्याचा निषेध करत भाजपने कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. गंगाधरे यांनी महापौर पक्षपातीपणे वागल्या असून यापुढे पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांना न नेमता राज्य निवडणूक आयोगाचा अधिकारी असावा अशी सूचना केली आहे.

भाजप नगरसेवकांचा चिटणीसांच्या घराबाहेर ठिय्या

एस व  टी प्रभाग समितीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला नियमबाह्य मदत केल्याच्या निषेधार्थ शनिवारी भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापालिका चिटणीस (प्रभारी) संगीता शर्मा यांच्या गोरेगाव येथील घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीनंतर चिटणीसांनी पळ काढला म्हणून नगरसेविका थेट त्यांच्या घरी पोहोचल्या.

 "