Wed, Jan 20, 2021 21:08राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे ज्‍येष्‍ठ स्‍वयंसेवक सुरेंद्र थत्ते यांचे निधन

Last Updated: Nov 28 2020 6:54PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेंद्र भास्कर थत्ते यांचे वृद्धापकाळाने नाशिक येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ऐंशी होते. मुंबई गिरगाव येथील ठाकूरद्वार मंडलाचे ते स्वयंसेवक होते. घरात रा. स्व. संघाचे वातावरण असल्याने बालपणापासून संघ शाखेशी ते जोडले गेले होते. 

कऱ्हाड आणि पुणे येथे सुरेंद्र थत्ते यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. पुणे विद्यापीठातून टेलिकॉम विषयातील अभियांत्रिकी पदवी ( B.E.Telecom) त्यांनी प्राप्त केली होती. टीआयएफआर ( TIFR )  मध्ये त्यांनी काही काळ सायंटिकफिक अधिकारी म्हणून नोकरी केली होती. ती स्थिर, चांगल्या वेतनाची नोकरी सोडून सुरेंद्र थत्ते यांनी संघ प्रचारक म्हणून काही काळ काम केले होते. प्रचारक म्हणून थांबल्यावर मुंबईत गिरगाव येथे स्वतःचा सु-भास्कर या नावे अभियांत्रिकी व्यवसाय सुरू केला होता. 

आणीबाणीत शेवटपर्यंत भूमिगत राहून मुंबईत लोकशाहीच्या रक्षणाचा लढा देण्यात सुरेंद्र थत्ते सक्रिय होते. सुरेंद्र थत्ते यांच्या आई माई यांनी कारावास भोगला होता. मुंबई महानगराच्या आणि महाराष्ट्र प्रांताच्या रा. स्व.संघाच्या कामात सुरेंद्र थत्ते यांचे भरीव योगदान राहिले आहे. मुंबई महानगर सहकार्यवाह, महाराष्ट्र प्रदेश महाविद्यालयीन प्रमुख, प्रदेश सहकार्यवाह म्हणून सुरेंद्र थत्ते यांनी काम केले आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐतिहासिक रथयात्रेचे महाराष्ट्र राज्यातील संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. स्वदेशी जागरण मंचाचे काम महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तत्कालीन एन्रॉन विरोधी लढ्यात अग्रणी होते. एन्रॉन विरोधी लढा हिंसक न होता विधायक मार्गाने देण्यासाठी ते आग्रही होते.  

सुरेंद्र थत्ते कल्पक, सृजनशील होते. हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावाचे सुरेंद्र थत्ते यांची बौद्धिक सोपी आणि कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी असत. सामान्य व्यक्तीला सलगी देऊन त्याला संघटनेच्या कामात सहजपणे जोडण्याचे सुरेंद्र थत्ते यांचे कौशल्य होते. 

दीर्घकाळ मुंबईत बोरिवली येथे वास्तव्यास असणारे सुरेंद्र थत्ते गेली काही वर्ष नाशिक येथे रहात होते. सुरेंद्र थत्ते यांच्यावर शनिवारी नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.