Thu, Nov 26, 2020 20:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल-सीएनजी गाड्यांना मुंबईकरांची पसंती

पेट्रोल-सीएनजी गाड्यांना मुंबईकरांची पसंती

Last Updated: Nov 22 2020 2:23AM
मुंबई : चेतन ननावरे

मुंबईत झपाट्याने वाढणार्‍या डिझेल दराचा फटका डिझेलवर चालणार्‍या कार विक्रीवर दिसून आला आहे. मुंबईतील डिझेलवर चालणार्‍या कारची मागणी जवळपास निम्म्याने घसरली आहे. याउलट कारचालकांकडून पेट्रोल आणि पेट्रोल-सीएनजी असा दुहेरी पर्याय असलेल्या गाड्यांना पसंती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इंधनाचा शाश्वत पर्याय म्हणून समोर येणार्‍या इलेक्ट्रिक कारचा टक्काही हळूहळू सुधारत आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षातील 1 एप्रिल ते 18 नोव्हेंबर या काळात झालेल्या वाहन नोंदणीमध्ये डिझेल कारच्या नोंदणीत निम्म्याने घट, तर पेट्रोल, पेट्रोल-सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या नोंदणीत मोठी वाढ नोंदण्यात आली आहे.

या आर्थिक वर्षात डिझेलवर चालणार्‍या कारचा आकडा एकूण टक्केवारीत 15.51 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. याउलट पेट्रोलवर चालणार्‍या कारचा आकडा तब्बल 65.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पेट्रोल व सीएनजी असा दुहेरी पर्याय असलेल्या कारच्या मागणीतही निम्म्याने म्हणजेच 18.25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच इलेक्ट्रिक कार नोंदणीची टक्केवारीही दुप्पटीने वाढल्याची माहिती आहे. इलेक्ट्रिक कारसाठी आवश्यक चार्जिंग पॉईंटमध्ये वाढ झाल्यास भविष्यात मुंबईकरांचा ओढा इलेक्ट्रिक कार व सीएनजीच्या दिशेने दिसेल, असेही जाणकारांनी सांगितले.