Wed, Dec 02, 2020 09:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईवर आता डेंग्यू, मलेरियाचे सावट 

मुंबईवर आता डेंग्यू, मलेरियाचे सावट 

Last Updated: May 23 2020 1:15AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने लॉकडाऊन काळातही शोधण्यात येत आहेत. 13 ते 21 मे  या नऊ दिवसांच्या कालावधीत तब्बल 1 हजार 146 ठिकाणी एडिस एजिप्ती या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणार्‍या डासांच्या अळ्या, तर 333 ठिकाणी मलेरिया वाहक ऍनॉफिलीस स्टिफेन्सी डासांच्या अळ्या आढळून आल्या. डासांची ही उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली.

पालिकेच्या कीटकनाशक खात्यातील 1 हजार 500 कामगार  व अधिकारी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही मुंबईच्या कानाकोपर्‍यातील विविध भागांचे व इमारतींच्या परिसरांचे डेंग्यू व मलेरियाच्या अळ्यांचा शोध घेत आहेत. या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणार्‍या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या व बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी आदींची तपासणी करण्यात येत असल्याचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे 3 आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान 4 वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. 

हे डास डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट देखील केली जातात. सर्वसामान्य नागरिकदेखील आपापल्या स्तरावर याबाबतची काळजी सहजपणे घेऊन डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना अटकाव करू शकतात, असेही नारिंग्रेकर यांनी सांगितले.

घरातच मिळते डेंग्यू व मलेरियाला आमंत्रण

80 टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणार्‍या ‘एडीस इजिप्टाय’ डासांची उत्पत्तीस्थाने आढळून येतात. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. 

सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे, घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणार्‍या ताटल्या (प्लेट्स), वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे याठिकाणी डासांची उत्पत्ती आढळून आली आहे. साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठवलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळावा.