Sat, Sep 19, 2020 18:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत घुमला ढोल-ताशांचा गजर

मुंबईत घुमला ढोल-ताशांचा गजर

Published On: Sep 12 2019 1:49PM | Last Updated: Sep 12 2019 11:42PM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेश मूर्तींसह दहा दिवसांच्या घरगुती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गणेश गल्ली मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीस रंग-बिरंगी फुलांची सलामी देत, तर लालबागचा राजाला कोळी नृत्याने सलामी देत विसर्जनाला सुरूवात झाली. मुंबईतील बहुतेक गणपती चिंचपोकळी उड्डाणपुलावरील मार्गस्थ होत असल्याने गणेशभक्तांनी लालबागमध्ये सकाळपासूनच तोबा गर्दी केली आहे.

गोदी कामगारांचा राजा असलेल्या कॉटनग्रीनचा राजा लालबागमधून पुढे गेल्यानंतर मुंबईचा राजा आणि लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक पुढे सरकरण्यास सुरूवात झाली. उद्या सकाळपर्यंत लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरू राहील, अशी शक्यता मंडळातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. शतक महोत्सव साजरा करणारा चिंचपोकळीचा चिंतामणीची विसर्जन मिरवणुकही थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहे. 

सार्वजनिक व घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिका आणि पोलिसही सज्ज झाले आहेत. मुंबईतील सुमारे ५३ रस्ते विसर्जन मिरवणुका सुरळीत व्हाव्या म्हणून वाहतुकीसह बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय ५६ रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत सामील होणाऱ्या भक्तांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने ९९ रस्त्यांवर आज नो पार्किंग केलेले आहे. त्यामुळे या मार्गांवर ती कोणत्या प्रकारची ची वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, विसर्जन मिरवणुकांमुळे कोंडी होऊ नये म्हणून मुंबईतील १८ रस्त्यांवर अवजड वाहनांना एका दिवसापुरती वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. 

चौपाट्यांवर घुमला 'पुढच्या वर्षी लवकर या' जयघोष

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषातच सकाळपासून गिरगाव, दादर, जुहू चौपाटी दुमदुमू लागल्या आहेत. हजारो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपट्यांसह गेटवे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, वरळी सी फेस या विसर्जन स्थळांवर एकवटले आहेत. मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलासह मुंबई पोलिस आणि एनडीआरएफसुद्धा विसर्जन स्थळांवर करडी नजर ठेवून आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत तरी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडत असताना दिसत आहेत. 

पारंपरिक वाद्यांना पसंती

यंदाही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डिजेला बगल देत पारंपरिक वाद्यांचा बोलबाला दिसला. गणेश मंडळांनी ठेवलेल्या ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर ठेका धरत बाप्पाच्या लाडक्या गाण्यांवर भक्तांनी ही मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला.

११ व्या दिवसी सुमारे २२१६८ गणेशमुर्तींचे विसर्जन 

सार्वजनिक मंडळ - १७००, घरगूती - २०२८४, गौरी- १८४, एकूण २२१६८ असे गणेशमुर्तींचे आज ११ व्या दिवशी विसर्जन करण्यात आले आहे. यातील कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक मंडळांचे ४८, घरगूती २८४९, गौरी ०४ असे २९०१ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले आहे. तर विसर्जना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नसून तशी कोणतीच नोंद नसल्याचे डीएमयूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.