आज जाहीर होणार अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

Last Updated: Aug 10 2020 1:06AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी सुरु असलेल्या अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर होणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पुढील पार्ट 2 भरता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाला 26 जुलैपासून प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी नोंदणीला विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश अर्जातील भाग क्रमांक 1 हा 1 ऑगस्टपासून भरण्यास प्रारंभ करण्यात आला. मुंबई एमएमआर विभाग तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अकरावीचे ऑनलाइन प्रवेशाचे अर्ज भरले जात आहेत. राज्यभरात रविवारी सायंकाळपर्यंत 4 लाख 31 हजार 499 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केले आहे. या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग एक भरुण नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई एमएमआर विभागात 2 लाख 19 हजार 503 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. औरंगाबाद 18 हजार 455, अमरावती 11 हजार 778, नागपूर 35 हजार 149 आणि नाशिक 28 हजार 113 आणि पुणे मध्ये 90 हजार 496 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी या विभागातील सर्व मिळून 1 लाख 6 हजार विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना भाग दोन भरायचा आहे. यासंदर्भातील वेळापत्रक सोमवारी जाहीर होणार आहे. नोंदणी केलेल्या आणि अर्ज प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना आता भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आवडीच्या कॉलेजांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे आहेत. या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया तसेच प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक सोमवारी जाहीर होणार असल्याचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.