Wed, Aug 12, 2020 03:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कांद्याची चोरी; दोघांना अटक (video)

मुंबई : कांद्याची चोरी; दोघांना अटक (video)

Last Updated: Dec 11 2019 8:28AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : प्रतिनिधी

सध्या वाढलेल्या कांद्याच्या दराचा फायदा घेण्यासाठी दोन युवकांनी कांदा चोरल्याची घटना मुंबईतील डोंगरी परिसरात घडली आहे. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना जेरबंद केले. दोन्ही आरोपींनी वडाळा डोंगरी, शिवडी व भायखळा या परिसरामध्ये कांद्यांच्या स्टोअरवरून कांद्याची चोरी केली आहे. 

चोरट्यांनी सुमारे 21,160 रुपयांचा कांदा चोरला आहे. कांदा चोरत असताना हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यावरुन पोलिसांनी दोघांनी पकडले. साबिर मोहम्मद शफी शेख, इमरान अब्दुल लतीफ शेख अशी या चोरट्यांची नावे असून दोघेही डोंगरी परिसरात राहतात.

दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी योग्य व अचूक तांत्रिक बाबींचा वापर करून दोघा चोरट्यांची छायाचित्रे प्राप्त केली आणि डोंगरी परिसरात खबरींच्या माध्यमातून त्यांना पकडण्यात आले. पालागल्ली येथे सापळा लावून एकाला स्कूटरसह ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव साबिर शफी शेख (वय 30) असल्याचे सांगितले. 

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने त्याचा मेहुणा इमरान शेख याच्या मदतीने शिवडी, भायखळा, डोंगरी, वडाळा या परिसरात कांद्याची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नमूद गुन्ह्यातील त्याचा मेव्हणा यास गुडलक बिल्डिंग दुसरा माळा केजीएन गेस्ट हाऊसच्यावर डोंगरी, मुंबई या ठिकाणावरून ताब्यात घेतले. या प्रकरणी केलेल्या चौकशीत दोघांनी संगनमत करून कांदा चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करण्यात आली आहे.