Thu, Sep 24, 2020 17:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरून गदारोळ

मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरून गदारोळ

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:58AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

साकीनाका येथील आगीच्या दुर्घटनेच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी मुंबईचेे त्रिभाजन करण्याची मागणी केल्याने विधानसभेत एकच गदारोळ उडाला. हा काँग्रेसचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप करीत भाजप-शिवसेना आमदारांनी विधानसभेचे कामकाज बंद पाडले. 

नसीम खान यांनी साकीनाका येथे झालेल्या अग्नितांडवाची माहिती देताना मुंबईवर असलेल्या लोकसंख्येच्या भारामुळे नागरी सुविधांवर ताण पडत असल्याचे सांगत मुंबईचे त्रिभाजन करण्याची मागणी केली. त्याला भाजप आमदार आशिष शेलार यांनी जोरदार आक्षेप घेत हा मुंबईचे तुकडे पाडण्याचा डाव असून ते सहन करणार नाही, असे सुनावले. त्यानंतर भाजपचे अन्य आमदारही आक्रमक झाले. 

राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार नसीम खान यांच्या मदतीला धावले, ते म्हणाले,  मुंबईचे तुकडे पाडण्याचा कोणताही विषय नाही. नसीम खान यांनी तसे काहीही म्हटले नाही. हा मुंबईकरांच्या सुविधेचा विषय असताना आशिष शेलार या विषयाला नाहक वेगळे वळण देत आहेत. मात्र भाजप आमदार नसीम खान यांच्या विरोधात घोषणा देत वेलमध्ये उतरले. त्यातच शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी नसीम खान यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच गदारोळ उडाला. परिणामी कामकाज दहा मिनिटे तहकूब झाले. 

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर नसीम खान यांनी आपण मुंबईच्या विभाजनाची कोणतीही मागणी केली नसून मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता दिल्लीप्रमाणे तीन आयुक्तालये करण्याची मागणी केल्याचे सांगितले. तरीही भाजप-सेनेच्या आमदारांची हौदात घोषणाबाजी सुरूच होती. दुसरीकडून काँग्रेसचे आमदारही घोषणा देत होते.

नसीम खान यांची मागणी म्हणजे मुंबईच्या विभाजनाचा डाव आहे. हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितल्यानंतर शिवसेना आमदारांनीही नसीम खान यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावर नसीम खान काहीही चुकीचे बोलले नाहीत. उगाच इश्यू करू नका, अशी तंबी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. मात्र गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज अर्धा तासासाठी पुन्हा तहकूब झाले.