Sat, May 30, 2020 15:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, महाराष्ट्राचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक

मुंबई, महाराष्ट्राचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक

Last Updated: Apr 06 2020 1:05AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रविवारी एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद  येथील आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आतापर्यंत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आता कोरोना मृत्यूंमध्येही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र रविवारी समोर आले. 

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली  येथील एका 67 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते. तर कस्तुरबा रुग्णालयातच एका 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. 

नायर रुग्णालयात एका 62 वर्षीय पुरुषाचा, केईएम रुग्णालयात एका 60 वर्षीय पुरुषाचा, कस्तुरबा रुग्णालयात एका 52 वर्षीय पुरुषाचा तर केईएम रुग्णालयात आणखी एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांनी कोणीही परदेश दौरा केला नव्हता. चेंबूर येथेही एका खासगी  रुग्णालयात एका 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळावर येत - जात असे. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांनाही संसर्गाचा धोका आहे. कस्तुरबा रुग्णालयात एका 77 वर्षीय पुरुषाचा, चेंबूर येथील खासगी रुग्णालयात 80 वर्षीय पुरुषाचाही कोरोनाने बळी घेतला. 

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या 60 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. ससून रुग्णालयातच 52 वर्षांच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. औंध येथेही एका 77 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवाारी 58 वर्षांच्या बँक अधिकार्‍याचा मृत्यू झाला. हा औरंगाबाद येथील पहिला मृत्यू आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 45 झाली आहे.