Wed, Jul 08, 2020 05:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुणीही वापरू शकतो मराठी बाणा : उच्च न्यायालय

कुणीही वापरू शकतो मराठी बाणा : उच्च न्यायालय

Last Updated: Feb 19 2020 1:40AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

‘मराठी बाणा’ या शब्दावरून लोककलाकार अशोक हांडे आणि शेमारू कंपनीत सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने अशोक हांडेंना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. शेमारू कंपनीने नव्याने सुरू केलेल्या सॅटेलाईट चॅनलच्या नावातून मराठी बाणा वगळण्याची विनंती न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांनी तूर्त फेटाळली. 

दिग्दर्शक अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा कार्यक्रम गेल्या 15  वर्षांपासून सर्वश्रुत आहे. मराठी बाणा या नावासाठी अशोक हांडे यांनी ट्रेडमार्कदेखील घेतले आहे. असे असताना शेमारू कंपनीने आपल्या नव्या मराठी चॅनेलसाठी मराठी बाणा हे नाव घेतले. त्यामुळे ट्रेडमार्कचे उल्लंघन झाल्याचा दावा करत दिग्दर्शक अशोक हांडे यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  आणि शेवटी चौरंग संस्थेमार्फत अ‍ॅड. राजेंद्र पै यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे .

कंपनीने मराठी बाणा हे नाव तत्काळ हटवावे तसेच नुकसानभरपाईपोटी 200 कोटी रुपये देण्याचे हायकोर्टाने कंपनीला आदेश द्यावेत,अशी मागणी हांडे यांनी याचिकेत केली आहे. न्यायमूर्ती बी.पी.कोलाबावाला यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत शेमारू कंपनीच्या वतीने अ‍ॅड. हिरेन कमोद यांनी सांगितले की, मराठी बाणा हा प्रचलित शब्द असून या शब्दातून मराठी भाषेच्या  अस्मितेचे दर्शन होते. अनेकदा हा शब्द स्वाभिमान दाखवण्यासाठीच वापरला जातो. एवढेच काय तर 19व्या शतकापासून मराठी बाणा या शब्दाचा वापर होत आहे. अनेक ऐतिहासिक पुस्तके, शालेय पुस्तके, कादंबर्‍यांमध्येही या शब्दाचा उल्लेख आहे. त्यामुळे मराठी बाणा या शब्दावर कुणाचाही वैयक्तिक  दावा असू शकत नाही. मराठी बाणा ही एक भावना आहे. कोणीही मराठीच्या स्वाभिमानासाठी हा शब्द वापरू शकतो. त्यामुळे याचिकाकर्त्यांद्वारे या शब्दांचा अन्य व्यक्तींना वापर करण्यास आक्षेप घेणे चुकीचे आहे, असा दावा केला तो न्यायालयाने मान्य केला.