Fri, Jun 05, 2020 18:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनसारख्या २ लाख कोटींच्या प्रकल्पाला लागणार ब्रेक?

बुलेट ट्रेनसारख्या २ लाख कोटींच्या प्रकल्पाला लागणार ब्रेक?

Last Updated: Dec 03 2019 9:01PM
मुंबईः विशेष प्रतिनिधी

बुलेट ट्रेन हा निव्वल पांढरा हत्ती आहे. बुलेट ट्रेन सारख्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांच्या कामाला स्थगिती देण्याचा विचार आहे. असे प्रकल्प नंतर करता येतील का याची चर्चा आम्ही करत आहोत, असे महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळातील सदस्य जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगितले. राज्यसरकारवर तब्बल ४ लाख ७१ हजार कोटी आणि वेगवेगळ्या प्रकल्पांचे २ लाख कोटी असे एकूण ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

राज्यसरकारवरील कर्जाच्या आढाव्यासाठी मंगळवारी बैठकही बोलवली होती. तेव्हा पाटील यांनी ही माहिती दिली. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे. बुलेट ट्रेन सारखे काही प्रकल्प नंतर करता येतील का याचा विचार आम्ही करत आहोत. आघाडीच्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात कुठलाही घोळ नाही. लवकरच निर्णय होईल. तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, असे ते यावेळी म्हणाले.

भाजप सरकारच्या काळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीपूर्वी ते बोलत होते. बैठकीत राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत. त्याची सद्यस्थिती काय आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च किती आहे, त्यावर आतापर्यंत किती खर्च झालेला आहे. कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणे गरजेचे आहे. याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुबळही होते.

यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नवीन सरकार आल्यानंतर काम करत असताना मुख्यमंत्री कोणकोणते प्रकल्प चालू आहेत त्याचा आढावा घेतात. या प्रकल्पांची प्रगती कुठपर्यंत आली आहे, काय अडचणी आहेत हे जाणून घेत असतात. त्यात नवीन असे काही नाही. प्रकल्पांसाठी किती खर्च येणार आहे, यावर पूर्ण अहवाल येईल त्यावर विचारविनिमय होईल. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे काय, तर माझे मत होय असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

शेतकरी हा आघाडीसरकारचा केंद्रबिंदू असल्याने त्याच्यासाठी काय करायचे यावर प्रथम विचार केला जाणार असून बाकी विषय हे नंतर हातालले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. तातडी काय? यालाच आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आता लांबणीवर टाकले जाणार असल्याची चर्चा मंत्रालयात होती. पाच महत्वांच्या प्रकल्पांसदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये सामना होणार आहे. बुलेट ट्रेन, आरे कारशेड, नाणार रिफायणरी, कोस्टल रोड आणि समु्रध्दी महामार्ग. या पाच प्रकल्पांमधिल चार प्रकल्प भाजपसाठी महत्वाताचे तर एक प्रकल्प शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. त्यावरून हा सामना रंगणार आहे. शेतकर्‍यांना प्राधान्य हा कळीचा मुद्दा पुढे करून आघाडीचे नेते भाजपवर आता कुरघोडी करणार आहेत.

अहमदाबाद-मुंबई दरम्यान होऊ घातलेली भारतातील पहिली बुलेट ट्रेन २०२२ पर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे वारंवार जाहीर करण्यात आले आहे. मात्र याला उद्धव ठाकरे यांनी ब्रेक लावण्याचे ठरवले आहे. गेल्या ५ वर्षांत आम्ही सत्तेत होतो. पण ५ वर्षांत विकासकामे कधी, कुठे कशी झाली, किती खर्च झाला याबाबत मी माहिती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत. काही विकासकामे ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहत आहोत. बुलेट ट्रेनचा आढावा घेऊ, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते. त्याच पार्श्‍वभूमिवर आर्थिक आढावा घेण्यात आला आहे.

आरे कारशेडलाही स्थगिती देण्यात आली आहे. हा प्रकल्पही उध्दव ठाकरे तपासून पाहात आहेत. मी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली आहे. मध्यरात्री झाडांची कत्तल करण्यात आल्यानंतर मुंबईकरांनी त्याविरुद्ध आंदोलन केले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश मी दिले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी आता स्पष्ट केले आहे.

नाणार प्रकल्पही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निशाण्यावर आहे. या प्रकल्पासाठी ४४ अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार होती. भारत, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती इथल्या ऑईल कंपन्यांनी एकत्र येत या प्रकल्पाचं नियोजन केलं आहे. हा प्रकल्प १५ हजार एकर जागेवर साकारणार होता. त्यासाठी ८ हजार शेतकर्‍यांकडून जमीन घ्यावी लागणार होती. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर या प्रकल्पाचे काम स्थगित करण्यात आले होते. उध्दव ठाकरेंचा या प्रकल्पाला विरोध आहे.

केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी समृद्धी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या ८ तासांत कापणं शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी सरकारनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र आता उद्धव ठाकरे सत्तेत असल्यामुळे ते हा प्रकल्प पुढे चालवतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा, म्हणून मुंबईच्या विकासासाठी असा गाजावाजा करत उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ केला. यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे, तर केंद्राने आवश्यक परवानग्या दिल्या आहेत. पण, आता शिवसेनेने भाजपबरोबरची युती तोडल्यामुळे केंद्र सरकार या प्रकल्पाबाबत काय भूमिका घेते याची उत्सुकता आहे.