मुंबईतील ५० लाख लोकांना कोरोना होऊन गेला!

Last Updated: Aug 10 2020 1:19AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरातील 74 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला असून, ते त्यातून बरेही आले आहेत. मुंबईकरांमध्ये सामूहिक प्रतिकारक शक्‍ती तयार झाल्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेचा निष्कर्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे.

अन्य काही संस्थांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी केलेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेच्या निष्कर्षातच हर्ड इम्युनिटीची (सामूहिक प्रतिकारक शक्‍ती) बाब उघड झाली आहे. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकार यांनी कोरोनाशी लढा देऊन रुग्णसंख्या कमी केल्याचा आणि कोरोनामुक्‍तांची संख्या वाढविल्याच्या दाव्यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
सेरोलॉजिकल सर्व्हेमध्ये मुंबईतील 6,936 जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी कुणालाही कोरोनाची लक्षणे नव्हती. केवळ पॉझिटिव्ह झालेल्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी झोपडपट्टीत राहणार्‍या 57 टक्के आणि पक्क्या इमारतीत राहणार्‍या 17 टक्के लोकांना कोरोना आधीच होऊन गेला होता आणि ते त्यातून बरेही झाले होते, असे दिसून आले. म्हणजेच त्यांच्यात कोरोनाचे प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार झाले होते.

मुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात याचा विचार केल्यास असे दिसते की,  मुंबईची लोकसंख्या आहे 1 कोटी 30 लाख. त्यापैकी सुमारे 55 टक्के म्हणजे 71 लाख लोक झोपड्यांत राहणारे मानले, तर त्यापैकी 57 टक्के, म्हणजे सुमारे 40 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होऊन गेली. मुंबईतील 45 टक्के, म्हणजे 58 लाख 50 हजार नागरिक इमारतींमध्ये राहतात. यापैकी 16 टक्के, म्हणजे 9 लाख 36 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. याचा अर्थ मुंबईतील 49 लाख 83 हजार, म्हणजे सुमारे 50 लाख नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 38 टक्के इतके होते. सेरोलॉजिकल सर्व्हेतून काढलेला हा निष्कर्ष आहे.

मुंबईसारख्या महानगरातील 37 टक्के लोकांना कोरोना होत असेल  आणि ते केवळ स्वतःच्या प्रतिपिंडांमुळे बरे होत असतील, मग सरकारी आणि पालिका यंत्रणेने नेमका कुणाशी लढा दिला? आणि कुठला आलेख शून्यावर आणला?

आता असाच सर्व्हे राज्यभरात घेतला, तर 11 कोटी जनतेपैकी किती जणांना बाधा झाली वा होणार असेल याचा अंदाजदेखील भयंकर असू शकतो. बांधण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यामुळे झोप उडेल इतकी ही संख्या महाप्रचंड असेल.

याच पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या यशापयशाचाही आढावा घ्यावा लागेल. लॉकडाऊन सुरू असतानाही देशात आणि राज्यातही रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत होती. त्यामुळेच आता लॉकडाऊन वाढवण्याऐवजी व्यवहार आणि उद्योग सुरू करण्यावर भर न दिल्यास अर्थचक्र पार थंडावेल आणि ते पूर्वपदावर आणण्यासाठी खूप जास्त नुकसान सोसावे लागेल.

सेरोलॉजिकल सर्व्हे म्हणजे काय? 

सेरोलॉजिकल सर्व्हे याचा अर्थ एका विशिष्ट कारणासाठी केलेली अनेकांची रक्‍त तपासणी. या तपासणीत रक्‍तात काही आजारांचे प्रतिपिंड तयार झाले असल्याबद्दल पृथक्‍करण केले जाते. संबंधित व्यक्‍तीच्या शरीरातील प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करून एखाद्या आजारास सामोरे जाण्याच्या प्रतिकारक शक्‍तीचे निश्‍चित अनुमान बांधता येते. त्या व्यक्‍तीची झालेल्या आजाराचा मुकाबला करण्याची क्षमता किती आहे, हे स्पष्ट झाल्याने साथीच्या आजाराचा पूर्ण अंदाज करता येतो.