Mon, Nov 30, 2020 13:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'आरे'मध्ये मेट्रो भवन उभारण्याच्या हालचाली?

'आरे'मध्ये ३३ मजली मेट्रो भवन उभारण्याच्या हालचाली ? पर्यावरणवाद्यांकडून विरोध

Last Updated: Oct 20 2020 1:30AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवल्याने पर्यावरण प्रेमीं आनंद व्यक्त करत असतानाच त्याच जागी भुमापन सर्वेक्षण सुरू झाल्याचे समोर आले. पर्यावरण वाद्यांनी त्याची माहिती घेतली असता आरे मध्ये 33 मजली मेट्रो भवन उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समोर आल्याने सरकारच्या दुटप्पीपणामुळे पर्यावरणवाद्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द झाला असला तरी काही ठेकेदारांचे काम सुरू असल्याचे समोर आले. आरे कारशेड प्रकल्प रद्द झाल्यानंतर ही काही दिवसांतच पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारले असता, मेट्रो कंट्रोल स्टेशन उभे करणार असल्याची माहिती  पर्यावरणवाद्यांना मिळाली आणि ते सावध झाले.

माहिती घेत असताना आरे मध्ये मेट्रो भवन उभे राहणार असून त्यासाठी १०० झाडांचा बळी आणि नदी नाल्याला अडथळा होऊ शकतो, असे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच वॅलबुट्ट नाल्याजवळ भिंत बांधून गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा आरे परिसरात भुमापन सर्वेक्षण सुरू करण्यात आले असल्याचे पर्यावरण वाद्यांनी समोर आणले.

पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद यांनी या प्रकाराबद्दल आक्षेप नोंदवला आहे. या सर्व हालचाली संशयास्पद असल्याचे ते सांगतात. आरे कारशेडचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच जागेवर बिकेसी प्रमाणे ३३ मजली मेट्रो भवन त्यात रेस्टॉरंट, गाळे, पार्किंग, थिएटर अशी सोय करण्यात येणार असून त्यासाठी हे सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरे मेट्रो प्रकल्प रद्द केलेला आहे तसा हा प्रयत्नही आम्ही हाणून पाडू असे त्यांनी सांगितले. 

आरे परिसरातून वाहणाऱ्या मिठी तसेच ओशिवरा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठावर बऱ्याच ठिकाणी १५ फूट उंचीची भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीवर पर्यावरणवादी स्टॅलिन यांनी आक्षेप घेतला आहे. आरेमधून नैसर्गिक प्रवाहात वाहणाऱ्याया नदीच्या काठावर भिंत बांधण्याची काही आवश्यकता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुराचे पाणी जंगलात शिरू नये यासाठी भिंत बांधण्यात आल्याचे आरे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र  जंगलात पूर कसा येईल आणि याबद्दल कुणी तक्रार केली असा सवाल त्यांनी केल्यावर आरे प्रशासनाने कोणतेही उत्तर अद्याप दिलेले नाही.

याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती स्टॅलिन यांनी दिली. तर ही भिंत काढून टाकण्याची मागणी करत तर पालिकेला निवेदन दिले आहे. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सह पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांना ही पत्र लिहिले आहे.