होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर बोला आता जपून!

मोबाईलवर बोला आता जपून!

Last Updated: Dec 03 2019 1:32AM
मुंबई/नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

व्होडाफोन, आयडिया, एअरटेल आणि जिओ या जुन्या टेलिकॉम कंपन्यांनी 3 डिसेंबरपासून प्री-पेड मोबाईल सेवांच्या दरात 50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या चार वर्षांतील ही पहिलीच वाढ आहे. व्होडाफोन,आयडिया आणि एअरटेल यांनी रविवारी स्वतंत्र निवेदने दिली आहेत. जिओने अद्याप यासंदर्भातील अधिकृत तपशील जाहीर केलेला नसला तरी येत्या 6 डिसेंबरपासून दरात 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

व्होडाफोन आयडियाचा अमर्यादित डेटा आणि कॉलिंग सुविधेसह प्री-पेड योजनांचे दर वाढविले आहेत. इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी व्होडा-आयडियाने प्रति मिनिट 6 पैसे शुल्कदेखील जाहीर केले आहे.  कंपनीने जास्तीत जास्त योजनेत वार्षिक 41.2 टक्क्यांनी वाढ केली आहे. या योजनेचा दर 1,699 रुपयांवरून 2,399 रुपयांवर गेला आहे. त्याचप्रमाणे दररोज दीड जीबी डेटासह 84 दिवसांच्या वैधतेच्या योजनेतील दर 311 टक्क्यांनी वाढवून 458 रुपयांवरून 599  रुपये करण्यात आला आहे. त्याशिवाय अल्पावधीत लोकप्रिय झालेली व्होडा-आयडियाचा 199 रुपयांचा प्लॅन आता 249 रुपये असेल. 

एअरटेलनेही मर्यादित डेटा आणि विविध कॉलिंगच्या योजनांच्या शुल्कामध्ये बदल केला आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांना प्राधान्य देत, नेटवर्क फीमध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यात कंपनी ग्राहकांना 300 टक्के अधिक लाभ देईल असा  दावा केला आहे. यासंदर्भात एअरटेल कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी शाश्वत शर्मा म्हणाले की, आमच्या नवीन मोबाईल योजना ग्राहकांना प्रचंड मूल्य देतात आणि त्यांना एअरटेलच्या राष्ट्रव्यापी 4 जी नेटवर्कचा लाभ घेता येईल. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येईल.

दूरसंचार क्षेत्राला आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत असताना अशा या तीन प्रमुख खासगी दूरसंचार सेवा प्रदात्यांनी शुल्कात वाढ केली आहे. मोबाईल कंपन्यांच्या संघटना सीओएआय, सीआयआय, एफआयसीसीआय या दोन मोठ्या उद्योग मंडळाने या क्षेत्राला बुडण्यापासून वाचवण्यासाठी सरकारला पत्रही लिहिले आहे.

नाहक भुर्दंड  

दरवाढीचा भुर्दंड नाहक ग्राहकांना सोसावा लागत आहे. मोबाईलधारकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे कंपन्यांकडून अवलंबले जातात. आता मात्र दरमहा रिचार्ज करताना देखील मोठी अडचण होईल. विशेषत: फोनवर तासन्तास गप्पा मारणे परवडणार नाही. 

रिटेल विक्रेत्यांची चांदी

नुकसान भरून काढण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून प्रीपेड प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. या प्लॅनमधील ग्राहकांनाच आर्थिक झळ बसणार आहे. कमी दर असलेल्या  कंपन्यांकडे ग्राहक वळण्याची शक्यता असली तरी त्यासाठी ग्राहकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल कारण सार्‍याच कंपन्या आता प्रीपेड महाग करण्याच्या तयारीत आहेत. यात रिटेल विक्रेत्यांची चांदी होणार आहे. दरवाढीमुळे त्यांना चांगले कमिशन मिळेल.

चांगले नेटवर्क द्या

खरे तर  सर्वच मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचे तीनतेरा वाजले आहेत. , एकाच घरात आता कुठे फोर जी, थ—ीजीची रेन्ज मिळते. फोन करण्यासाठी किंवा इंटरनेटसाठी घर अथवा ऑफिसमधून बाहेर यावे लागते. रेंज मिळत नसतानाही दरवाढ करणे चुकीचे आहे. आधी सुविधा नीट द्या आणि मग दरवाढ करा, असे ग्राहकांना वाटत असले तरी त्याकडे ट्रायलाही लक्ष देण्यास वेळ नाही.  परिणामी या दरवाढीविरोधात ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळण्याचीच शक्यता अधिक आहे.