Thu, Jul 16, 2020 05:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्र्यांना हवी वास्तुशास्त्रानुसार बंगल्यांची रचना

मंत्र्यांना हवी वास्तुशास्त्रानुसार बंगल्यांची रचना

Last Updated: Feb 15 2020 2:03AM
मुंबई : पुढारी डेस्क
राज्यातील  बहुतांश मंत्र्यांनी आपल्याला मिळालेल्या बंगल्याची डागडुजी व्हावी असा आग्रह धरला आहे. तर अधिकार्‍यांच्या मते सर्वच बंगल्यांच्या डागडुजीची गरज नाही. समुद्रालगत जे बंगले आहेत आणि ज्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे. अशा बंगल्यांची काही प्रमाणात झीज झाली आहे. तर काही बंगल्यांचे लाकूड खराब झाले आहे. असेच बंगले दुरूस्त करायला हवेत असे त्यांचे म्हणणे आहे.

काही मंत्र्यांनी आपले बंगले वास्तु शास्त्रानुसार हवेत असा आग्रह धरला आहे. बंगल्यातील त्यांचे कार्यालय, स्वयंपाकघर आणि झोपण्याच्या खोल्या यांची दिशा बदलावी अशी मागणी केली आहे. आधीच्या मंत्र्यांनी वापरलेले फर्निचर आपल्याला नको, ते बदलण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

2016 च्या महालेखापालांच्या अहवालानुसार मंत्र्यांच्या बंगल्यांवर आणि मंत्रालयातील कार्यालयावर प्रचंड खर्च करण्यात आल्याचे ताशेरे ओढले आहे. 2010 ते 2015 या कालावधीतील खर्च तब्बल 52 कोटी इतका झाला आहे. तो ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा 6 ते 20 पटीने अधिक असल्याचे महालेखापालांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तर इतका खर्च झाला आहे की त्यापेक्षा कमी रक्कमेमध्ये नवी वास्तू उभारता आली असती असेही नमूद करण्यात आले आहे. 

अनेक बंगल्यांवर मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाला आहे. त्यात पुरातन (3.5 कोटी) मेघदूत (3.3 कोटी) पर्णकुटी (3.2 कोटी) सातपुडा (3 कोटी) सेवासदन (3.1 कोटी) जीतवन (2.77 कोटी) रामटेक (2.7 कोटी) चित्रकूट (2.5 कोटी) देवगिरी (2.5 कोटी)

सरकार आर्थिक अडचणीत असताना बंगल्यांवर अकारण खर्च होऊ नये. बहुतांश बंगले राहण्यायोग्य आहेत तरीही त्यांची डागडुजी कशासाठी ? हे बंगले राहते घर आहेत. ते हॉलिडेहोम नव्हे अशी टीका औरंगाबाद येथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली पाटील यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका ठेकेदाराने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, जवळपास सर्वच बंगल्यांच्या टाईल्स चांगल्या स्थितीत आहेत. त्यांचे दरवाजेही व्यवस्थित आहेत तरीही ते बदलून द्यावेत अशी मागणी केली जात आहे.

ज्यांच्या बंगल्यांवर कमी खर्च झाला आहे. अशा दोन व्यक्ती आहेत.  विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर 92.7 लाख रुपये खर्च झाला आहे. तर राज्याचे पर्यटनविकास मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ए -6 या बंगल्यावर 74 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.