धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन! भाजप महिला मोर्चाचा इशारा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

Last Updated: Jan 13 2021 8:53AM

सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ओशिवरा पोलिस ठाण्यात एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार त्यांच्याच नात्यातील एका महिलेने केली आहे. याबाबत १० तारखेला तक्रार दिली असून ११ तारखेला पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला आहे. मात्र, आपल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचे ट्विट करत या महिलेने म्हटले आहे. दरम्यान, 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, असा खळबळजनक खुलासा धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला.

वाचा : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार, ‘त्या’ महिलेने तक्रारीत काय म्हटले..

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी ताबडतोब राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे (Uma Khapre, President  Mahila Morcha Maharashtra Pradesh BJP) यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

काय लिहिलंय पत्रात...

“ आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचेविरुद्ध ११ जानेवारी रोजी रेणू अशोक शर्मा हिने ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. 

धनंजय मुंडे यांनी आपल्या स्वतः फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून कबूल केलं आहे की, ‘करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांवर या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून, स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.''

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण वरील गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. या घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. 

वरील वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी,” असे इशारा उमा खापरे यांनी पत्रातून दिला आहे.

वाचा : 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते : मंत्री धनंजय मुंडे