Mon, Sep 21, 2020 17:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील मच्छीमारांचे स्थलांतर

राज्यातील मच्छीमारांचे स्थलांतर

Last Updated: Feb 15 2020 1:51AM
मुंबई : चंदन शिरवाळे
यंदाच्या परतीच्या पावसाचा अपवाद वगळता राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांमधील पाण्याची पातळी खोल गेली आहे. स्थानिक ठिकाणी मासे न मिळाल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील मच्छीमारांनी स्थलांतर केले आहे.  विविध औद्योगिक प्रकल्पांमुळे बोटींना जागा व मासे मिळणे बंद झाल्याने मुंबईतील 9 कोळीवाड्यांनी मासेमारीला रामराम केला आहे. दर्याचा राजा समजला जाणारा हा समाज आता पोटापाण्यासाठी कुठेतरी नोकरी करून उपजीविका करत आहे. शेतकर्‍यांप्रमाणेच मच्छीमारांनाही नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने समुद्रालगत उभारलेले प्रकल्प या समाजाच्या मुळावर आले आहेत. तर काही ठिकाणी भराव टाकून जमिनी तयार केल्या आहेत. तारापूर अणुभट्टी व ओएनजीसी समुद्रात विविध प्रकारच्या चाचण्या घेतात. डहाणू थर्मल पॉवर केंद्र, बोईसर, पालघर, वसई, भाईंदर, बोरिवली, मरोळ, मालाड, अंधेरी येथील एमआयडीसी तसेच तळोजा, महापे, पनवेल, महाड, परशुराम लोटे, चिपळूण, रत्नागिरी आणि अलिबाग पट्ट्यातील कारखाने आणि उरण येथील जेएसडब्ल्यू ही कंपनी प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडत आहे. त्यामुळे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे.

प्रस्तावित नरिमन पॉईंट ते दहिसर या सागरी मार्गामुळे लवकरच वरळी, माहीम, दांडा या मुंबईतील कोळीवाड्यांची मासेमारी नष्ट होणार आहे. तसेच जेएनपीटीने आपल्या जहाजांसाठी चॅनेल चारच्या मार्गाचा विस्तार केला आहे. त्यामुळे मोरगाव, उरण, रेवस, बोरणे, थळ आणि नवगाव या अलिबाग परिसरातील डोलीचे  धंदे बंद होणार आहेत. सध्या तेथे खोलीकरण सुरू असल्यामुळे मच्छीमारांना येऊ दिले जात नाही.

भांडवलदारांचा मत्स्य व्यवसायाला फटका बसला आहे. ते मासेमारीचे नियम पाळत नाहीत. पर्ससीन नेट, लाईट फिशिंग आणि 12 नॉटिकलच्या आतमध्ये मासेमारी केली जात आहे. बारा नॉटिकलच्या आतमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या थरांमुळे लहान बोटींना मासे मिळत नाहीत. या बोटी बारा नॉटिकलच्या पुढे गेल्यास व्यापारी बोटी धडक देऊन निघून जातात. दरमहा किमान दोन अपघात होतात. बोटीचे नुकसान होते, पण भरपाई दिली जात नाही. काही वर्षांपूर्वी व्यापारी बोटी 14 ते 17 नॉटिकल पट्ट्यापासून जात होत्या. पण केंद्र सरकारने त्यांना नुकतेच 35 नॉटिकल अंतर वाढवून दिले आहे. त्यामुळे मासे मिळण्याचे ठिकाण (फिशिंग राऊंड) मच्छीमाराच्या हातातून गेले आहे.

 "