Thu, Sep 24, 2020 11:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत म्हाडाची स्वस्त घरे वाढणार

मुंबईत म्हाडाची स्वस्त घरे वाढणार

Last Updated: Jan 23 2020 1:29AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना अनेक विकासकांनी म्हाडाला हाऊसिंग स्टॉक ऐवजी प्रीमियम दिला. त्यामुळे म्हाडाची तिजोरी जरी भरली असली तरी मात्र म्हाडाचा हाऊसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला. परिणामी घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य मुंबईकरांना म्हाडा स्वस्तातले घर देऊ शकले नाही. यामुळे आता मुंबईकरांना घर देण्याचा आपला उद्देश साध्य करण्यासाठी म्हाडा विकासकाकडून प्रीमियमऐवजी हाऊसिंग स्टॉक घेण्यावर भर देणार असल्याचे समजते. त्यामुळे हाऊसिंग स्टॉक वाढताच सामान्य मुंबईकरांना स्वस्तातील घरे उपलब्ध होणार आहेत. 

म्हाडा वसाहतीतील पुनर्विकास करताना पूर्वी विकासकाकडून गृहसाठा घेतला जात होता. म्हाडाकडे अशा प्रकल्पांमधून टप्प्याटप्प्याने घरे उपलब्ध होत असत.  त्यामुळेच म्हाडाकडे इतर बांधकाम प्रकल्पांबरोबरीने या घरांमुळे सोडतीच्या दृष्टीने पुरेसा साठा उपलब्ध होत होता. कालांतराने काही राजकीय पक्षांनी त्यास विरोध दर्शवित विकासकांची तळी उचलून धरली. म्हाडाने गृहसाठ्याऐवजी प्रीमियम रक्‍कम स्वीकृत करावी, यासाठी मोर्चाही काढला होता. या घडामोडीनंतर म्हाडाने गृहसाठ्याऐवजी प्रीमियम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून म्हाडाचा गृहसाठा कमी होत चालला आहे. 

सध्या म्हाडाच्या विविध भूखंडांवरील अतिक्रमणे रोखण्यासोबतच सर्व ठिकाणी स्वतः म्हाडा विकासकाची भूमिका पार पाडणार आहे. म्हाडाच्या 56 वसाहतींतील पुनर्विकासात प्रीमियमऐवजी गृहसाठा घेण्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच मत मांडले. म्हाडाच्या गोरेगाव येथील पत्राचाळीचा विकास आता स्वतः म्हाडा करणार असल्याचे निश्‍चित झाले असून लवकरच मोतीलाल नगर 1,2,3 चा देखील विकास स्वतः म्हाडा करणार आहे. यामुळे म्हाडासमोर निर्माण झालेली घरांची वानवा संपुष्टात येऊ शकते, असे मत व्यक्‍त केले जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून म्हाडा सामान्य मुंबईकरांना स्वप्नातली स्वस्त घरे लॉटरीच्या माध्यमातून देत आले आहे. म्हाडाची मुंबईत सुमारे 7 हजार एकरहून अधिक जागा आहे.तसेच म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. या सर्वांचा विचार करता भविष्यात या जागेवरील वसाहतींचा पुनर्विकास करताना विकासकांकडून प्रीमियमऐवजी हाऊसिंग स्टॉक घेतला तर म्हाडाला टप्प्याटप्प्यात लाखो घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांचे घरांचे स्वप्न देखील पूर्ण होईल.
 

 "