Thu, Sep 24, 2020 17:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘टायगर’च्या हल्ल्यात ‘देवा’चा धावा प्राईम टाईमसाठी !

‘टायगर’च्या हल्ल्यात ‘देवा’चा धावा प्राईम टाईमसाठी !

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:50AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी 

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार्‍या सलमान खान याचा बिगबजेट ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला प्राईम टाईमचे शो देण्यात येणार असल्याने त्याच दिवशी प्रदर्शित होणार्‍या  ‘देवा’ या मराठी चित्रपटाला मुंबईतील थिएटर मालकांकडून प्राईम टाईममध्ये शोसाठी नकार मिळत आहे. त्यामुळे या वादात मनसेच्या चित्रपट शाखेने उडी घेतली असून ‘देवा’ ला प्राईम टाईममध्ये शोसाठी वेळ द्यावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थिएटर चालकांना दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी व हिंदी चित्रपटांमधील वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शुक्रवारी ‘गच्ची’ व ‘देवा’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याचवेळी सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ देखील प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर जिंदा है’चे शो हवे असल्यास थिएटरमधील 95 टक्के शो आम्हाला द्यावेत, अशी भूमिका चित्रपट निर्मात्यांकडून थिएटर मालकांकडे मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये यशराज फिल्मसचा बॅनर असल्याने थिएटर मालकांनी त्यांची ही भूमिका मान्य केली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी मुंबईतील थिएटरमध्ये वेळ उपलब्ध नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. 

‘ट्युबलाईट’ हा चित्रपट फ्लॉप झाल्याने सलमानच्या या नव्या चित्रपटाकडे अवघ्या बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट यशस्वी होण्यासाठी निर्मात्यांनी सर्व काळजी घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे 95 टक्के शो मिळावेत अशी मागणी त्यांच्यांकडून करण्यात आली आहे. मात्र त्याचा फटका मराठी चित्रपटांना बसू लागल्याने त्यांनी मनसे चित्रपट सेनेकडे धाव घेतली. यासंदर्भात देवा चित्रपटाच्या निर्मिती टीमसोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची बैठक झाली. थिएटरमालकांनी शो जाहीर केल्यावर पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येईल, असा निर्णय बैठकीत झाला.थिएटरमालकांना खोपकर यांनी पत्र पाठवून मराठी चित्रपटासाठी प्राईम टाईममधील शो देण्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो यावर मनसेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

 अक्षय कुमार ‘देवा’च्या पाठीशी

हिंदी व मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध होण्यावरून वाद उफाळला असतानाच अभिनेता अक्षयकुमारने मराठी चित्रपट ‘देवा-एक अतरंगी’ चित्रपट पाहण्याचे आवाहन ट्विटरद्वारे केले आहे. देवा चित्रपटाचे निर्माते असलेले प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचे त्याने म्हटले आहे.  

अक्षयकुमारने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करुन आपले म्हणणे मांडले आहे. देव तारी त्याला कोण मारी,  प्रमोद फिल्म्स आणि देवा सिनेमाच्या पूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा. पाहायला विसरू नका, देवा-एक अतरंगी. तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये,  जय हिंद जय महाराष्ट्र, असे त्याने मराठीत व्हिडीओमध्ये म्हटले आहे.