Wed, Aug 12, 2020 09:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, विधीमंडळात ठराव

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, विधीमंडळात ठराव

Published On: Feb 27 2018 1:16PM | Last Updated: Feb 27 2018 1:19PMमुंबई : प्रतिनिधी

मराठी ही भाषा जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी याकरिता सरकारने मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस अधिक चालना द्यावी, असा एकमुखी ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात करण्यात आला. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात आलेल्या ठरावाचे वाचन केले. यावेळी सभागृहाच्या प्रेक्षागृहात पुरस्कार प्राप्त साहित्यिक हजर होते.

वाचा : संवादासाठी ‘मराठी’ चांगलं माध्यम

कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रामध्ये दिलेले मोलाचे योगदान, मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम, त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आल्याचे ठरावात नमूद करण्यात आले.

वाचा : मराठी गौरव गीतावरुन फडणवीस-जयंत पाटील यांच्यात जुंपली

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात येऊन त्यानंतरच्या काळात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या विकासाला चालना देण्यासाठी भाषा संचालनालय, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या संस्थाची निर्मिती करण्यात आली. मराठी भाषेचे धोरण ठरविण्याकरिता भाषा सल्लागार समिती नेमणे, त्याच प्रमाणे मराठी मधील विविध मान्यवर साहित्यिकांनी  तसेच नाट्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करून  मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांचे मन:पूर्वक अभिनंदन ठरवाद्वारे करण्यात आले.

वाचा : लाभले आम्हास भाग्य... बोलतो मराठी