Mon, Nov 30, 2020 13:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...अन्यथा सरकारविरोधात ‘जोडे मारो’

...अन्यथा सरकारविरोधात ‘जोडे मारो’

Last Updated: Nov 23 2020 2:18AM
नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे राबविण्यात येणार्‍या मराठा जोडो जनसंपर्क अभियानाचा तिसरा टप्पा रविवारी नवी मुंबई येथे पार पडला. मराठा समाजाला जागे राहून आपल्या हक्कांसाठी लढा देण्यास सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शांततेने चालणारी आंदोलने जास्त दिवस चालणार नाहीत व सरकारने आता योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा; अन्यथा मराठा जोडो आंदोलनाऐवजी सरकारला जोडे मारो आंदोलन घ्यावे लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सरकारला दिला.

मराठा आरक्षण व मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विविध भागातील समन्वयकांच्या भेटी घेऊन मराठा मागण्यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मराठा जोडो अभियान सुरू करण्यात आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा जोडो अभियान राबवण्यात येत आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

रविवारी नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाशी येथील पुतळ्यापासून मराठा जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, कळवा या ठिकाणी सभा घेऊन मराठा बांधवांनी मराठा आरक्षण मिळविण्याचा संकल्प घेतला. नेरूळ येथे या मराठा जोडो अभियानाचा समारोप झाला.

मराठा समाजावर सरकारतर्फे होत असलेल्या अन्यायाबाबत  निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाला आलेल्या स्थगितीबाबत सरकारची अनास्था व  स्थगितीनंतर सरकारकडून जाणूनबुजून होत असलेली नोकर भरती याचा निषेध करण्यात आला.

मराठा जोडो अभियानात अंकुश कदम, दिलीप जगताप, विनोद साबळे, अभिजित पाटील, बाळासाहेब शिंदे, उमेश जुनघरे, नितीन रांजने, अरुण पवार, राहुल पवार, राहुल शिंदे, मंदार जाधव, रमेश आंब्रे, इंद्रजित परब, शंकर नाना पार्सेकर, किरण सावंत, दीपक पठारे हे उपस्थित होते.