Fri, Apr 23, 2021 13:19
कटात सामील असल्याने मनसुखची हत्या

Last Updated: Apr 08 2021 2:41AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करून धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या कोठडीतमध्ये विशेष एनआयए न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तर, ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात अटक असलेल्या माजी निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपींना विशेष एनआयए न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपत असल्याने एनआयएने तिन्ही आरोपींना दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केले.

सचिन वाझे याच्या बँक खात्यात सुमारे दीड कोटी रुपये आहेत. वाझेकडून 36 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रेणीतील अधिकार्‍याकडे इतका पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक आहे. शेवटी यामागे काही तरी मोठा आर्थिक हेतू हेता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक आहे, असे म्हणणे एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी एनआयए न्यायालयात मांडले.

मनसुख हिरेन हे स्वतःही अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवलेल्या जिलेटीन कांड्याच्या कटात सहभागी होते. त्यातूनच त्यांचा जीव गेला. अन्य आरोपींनी मिळून 2 आणि 3 मार्च रोजी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला, असा गंभीर दावाही एनआयएतर्फे न्यायालयात करण्यात आला आहे. वाझे याच्यासोबत सध्या गुन्ह्यातील घटनाक्रमाचे पुनरावलोकन करण्यात येत आहे आणि बाकी असलेला तपास पूर्ण करण्यासाठी वाझे याची एनआयए कोठडी वाढवून मागण्यात आली.

वाझेसाठी एनआयएने चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली. यूएपीए कायद्यानुसार 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची तपासयंत्रणेकडून न्यायालयाला विनंती केली गेली. मात्र न्यायालयाने वाझे यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.