Fri, Jul 10, 2020 17:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हापूसचा दक्षिण अफ्रिकन भाऊ ‘मलावी’ मुंबईत

हापूसचा दक्षिण अफ्रिकन भाऊ ‘मलावी’ मुंबईत

Last Updated: Nov 19 2019 1:38AM
नवी मुंबई : राजेंद्र पाटील

दरवर्षी कर्नाटक आणि गुजरातच्या हापूसच्या घुसखोरीची चर्चा सुरू असताना यंदा कोकणातील हापूसला दक्षिण आफ्रिकेतील मलावी आंब्याच्या स्पर्धेलाही तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या मंगळवारी नवी मुंबईतील एपीएमसीत  घाऊक व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे  प्रथमच या आंब्यांचे आगमन झाले त्यानंतर सध्या दररोज 800 बॉक्सची आवक सुरू झाली आहे. 

 मलावी हापूसचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठीच असतो. मात्र या परदेशी आंब्याचा हा गोडवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. 2011 ते 2013 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील एका शेतकर्‍याने 40 हजार रोपांच्या काड्या नेल्या होत्या. त्यावर प्रक्रिया करून हापूसचेे मलावी आंबा हे संकरीत वाण तयार केले. या शेतकर्‍याकडे 1400 एकर जमीन असून त्यावर त्याने 40 हजार रोपांची लागवड करून त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहे. 

मुंबईत मलावी मँगो प्रायव्हेट लि. कंपनीच्या मार्फत हा आंबा भारतात येत असून त्यासाठी साडेतीन किलोला सातशे रुपये हवाई भाडे असून 38 टक्के आयात कर आहे. हा आंबा मुंबईत येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. एपीएमसीत येईपर्यंत साडेतीन किलोचा खर्च 1400 रुपयेे येतो. 

एपीएमसीत मलावी आंब्याचे दर 1400 ते 1800 रुपये प्रति बॉक्स असून आठवडाभरात 5500 बॉक्सची विक्री झाली, अशी माहिती एपीएमसी घाऊक फळ बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. एका बॉक्समध्ये साडेतीन डझन आंबे असतात.

पहिल्यांदाच कोकण हापूसवर प्रक्रिया करून नवीन जातीचे वाण परदेशात तयार करण्यात आले आहे.एपीएमसीत हा हापूस दुसर्‍यांदा दाखल झाला आहे. 20 डिसेंबरपर्यंत मलावी आंब्यांची आवक 25 हजार बॉक्सपर्यंत होण्याची शक्यता आहे.

आपला हापूस उशिराच

आंब्याचा मोहोर हा हवामानावर अवलंबून असतो. मात्र यंदा कालपरवापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे आता नवीन पालवी फुटू लागली आहे. सहाजिकच अंब्याला उशिरा मोहोर येणार आहे. त्यामुळे कोकणातून फेब्रुवारी-मार्चमध्ये मुंबईत येणारा आंबा यंदा उशिरा येईल. त्यातच थंडी जास्त पडणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आंब्यावर हे नैसर्गिक संकटच येऊ घातले आहे असे म्हणावे लागेल. कारण थंडी जास्त असेल तर मोहोर गळून पडतो.

- अशोक हांडे, आंबा व्यापारी

एक ते दीड महिना उशीर होणार

कोकणातील आंबा मुंबईसारख्या शहरांमध्ये साधारणत: फेब्रुवारी महिन्यात येतो. यंदा पावसामुळे तो एक ते दीड महिना उशिरा येईल. कारण मोहोर येण्याची प्रक्रिया 45 दिवस पुढे गेली आहे. पूर्वी पिकांसाठी पाऊस चांगला मानला जायचा. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पुर्‍या हयातीत इतका पाऊस यंदा आम्ही प्रथमच पाहिला. पावसामुळे झाडांमध्ये खताचे स्टोरेजही कमी झाले आहे. त्याचाही परिणाम उत्पन्नावर होणार आहे. एकट्या देवगडमधून सुमारे 15 हजार पेट्या आंबा बाहेर जातो. यंदा त्याबाबत निश्चित खात्री देता येणार नाही.

- शैलेश बोंडाळे, आंबा बागायतदार, देवगड (कुणकेश्वर)