होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संक्रांत : आरोग्य-सलोख्याचा मिलाफ

संक्रांत : आरोग्य-सलोख्याचा मिलाफ

Last Updated: Jan 15 2020 9:09AM
 विलास पंढरी

हिंदू धर्मियांची कालगणना चांद्र वर्षानुसार होत असल्याने त्यांचे सण दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या तारखेला येतात; पण संक्रांत मात्र दरवर्षी 14 जानेवारीला येते. याचे कारण म्हणजे चांद्र दिनदर्शिका व सौर दिनदर्शिका यांचा मेळ बसण्यासाठी केलेली शास्त्रीय तडजोड. चांद्र वर्षात 354 दिवस असतात, तर सौर दिनदर्शिका ही 365 दिवसांची असते. हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास असतो. म्हणूनच, सौर दिनदर्शिकेप्रमाणे संक्रांत ही नेहमी 14 जानेवारीला येते. संक्रांतीचे पुढे पुढे सरकण्याचे शास्त्रीय कारण पृथ्वीच्या परिक्रमेशी जोडलेले आहे.

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव तार्‍याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवतार्‍यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते, असे दिसेल.


पृथ्वी स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा 23 तास, 56 मिनिटे आणि 4.099 सेकंदांत पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी 24 तासांत म्हणजे एका दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रतिदिवशी हा फरक 86,000(24 तासांचे सेकंद)/365.25(एका वर्षातील दिवस) = 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो. या फरकामुळे मकरसंक्रांतीच्या तारखा पुढे जात आहेत. 

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे 21-22 डिसेंबरलाच सुरू झालेले असते. पृथ्वीवरून पाहिले असता, 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकू लागते.

इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. उपलब्ध माहितीनुसार या तारखा पुढीलप्रमाणे असून शंभर वर्षांत एक दिवस हा सण पुढे गेल्याचे दिसते.

इसवी सन 1600 मध्ये : 9 जानेवारी
इसवी सन 1700 मध्ये : 10 जानेवारी
इसवी सन 1800 मध्ये : 11 जानेवारी
इसवी सन 1850 साली 12 जानेवारी.

यंदा 14 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आहे. याच कारणास्तव यंदा मकर संक्रांतीचा सण बुधवारी, 15 जानेवारी रोजी साजरा होत आहे. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. महाभारतात पितामह भीष्म युद्धात जखमी झाल्यावर बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला ही कथा प्रसिद्ध आहे.

 मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्वधर्मियांनी साजरा करावा, असा मकरसंक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. सौर कालगणनेशी संबंधित हा सण आहे. आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे, फळांचे वाण (भेटवस्तू) एकमेकांना स्त्रिया देतात. हरभर्‍याचे घाटे, ऊस, बोरे, गव्हाची ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवालाही अर्पण करतात.

शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळामध्ये शरीरासोबतच सौंदर्याला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे तिळगुळाचे लाडू खाल्ल्यास थंडीमध्ये रुक्ष झालेली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळे सौंदर्य वाढण्यासदेखील मदत होते. तिळामधील कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम ही द्रव्ये हृदयासाठी फायदेशीर ठरतात. खाण्यात तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासही मदत होते. तीळ आणि गूळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ आहेत.  तसेच  उष्ण असल्याने बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात या निमित्ताने केला जातो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असा उदात्त हेतू या सणामध्ये दडला आहे.एका संशोधनामध्ये असे समोर आले आहे की, तिळामध्ये सेसमीन नावाचे एक अँटिऑक्सिडंट आढळून येते. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करते.

मकरसंक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो, यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. यातून गरिबांना, गरजूंना मदत मिळते. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी. त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो, असा एक समज आहे. बहुसंख्य स्त्रिया उपयोगी भेटवस्तू दान करतात. त्यातून एकत्र येणेही होते व सुखदुःखाची  देवाणघेवाण होते.

अशा रीतीने संक्रांतीचा सण सामाजिक व शारीरिक आपापल्या क्षेत्रात पिकणारे सिझनल निगडित खा, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला, स्नेह वाढवा  हा  संदेश देणारा आहे.