Sat, Sep 19, 2020 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राची आघाडी

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची आघाडी

Last Updated: Aug 05 2020 1:30AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह देशात अव्वल आला तर राज्यातून नेहा प्रकाश भोसले हिने 15 वा क्रमांक पटकावला. तर मूळच्या बीडच्या पण पुण्यातून तयारी केलेल्या मंदार पत्की याने 22 वा तर आशुतोष कुलकर्णी याने 44 वा क्रमांक पटकावला.

त्याचबरोबर अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर काही कारणाने दृष्टी गमावलेल्या जयंत मंकले याने 143 वा क्रमांक पटकावला आहे. युपीएससीच्या संकेतस्थळावर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ही लेखी परिक्षा सप्टेंबर 2019 मध्ये पार पडली असून फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखती आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 829 उमेदवारांची निवड करण्यात आली असून 11 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान 2019 मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास कोट्यातून 78 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. राज्यातून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी हे अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असलेले आहेत. याचबरोबर यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले व सध्या अन्य सेवेसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले. 

 "