Tue, Aug 04, 2020 13:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

Last Updated: Jul 14 2020 1:55AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 54 हजारांवर गेला असतानाच कोरोनामुळे देशात झालेले सर्वाधिक 10 हजार 289 मृत्यू हेदेखील महाराष्ट्रात झाले आहेत. एकूण रुग्णांमध्ये 4.04 टक्के रुग्ण दगावले आहेत. मृत्युदरात महाराष्ट्र देशात दुसरा असून, हा मृत्युदर  कमी करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. केरळ, ओडिशा, आसाम यासारख्या छोट्या राज्यांनी मृत्युदर अर्धा टक्क्यापेक्षा कमी ठेवण्यात यश मिळविले आहे. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 8 लाख 78 हजार 254 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 2 लाख 54 हजार रुग्ण सापडले आहेत. मात्र,  रुग्ण वाढत असतानाच महाराष्ट्र मृत्यू दर रोखण्यात अपयशी ठरला आहे. आतापर्यंत 10 हजार 289 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 2.64 टक्के असताना, महाराष्ट्रात मात्र हा दर दुपटीपेक्षा थोडा कमी आहे. 

देशात सर्वाधिक मृत्यू दर गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये 41 हजार 820 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 2 हजार 45 जणांचा मृत्यू झाला. हा मृत्यू दर 4.89 टक्के आहे. त्यानंतर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर आहे. तर मध्य प्रदेश तिसर्‍या स्थानी आहे. (3.70 टक्के). पश्चिम बंगाल 3.11 टक्के मृत्यू दरामुळे चौथ्या स्थानी आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण हे दिल्लीत आहेत. आतापर्यंत 1 लाख 12 हजार 494 बाधित रुग्ण सापडले आहेत. दिल्लीचा मृत्यू दर 3 टक्के आहे.

काही छोट्या राज्यांनी मात्र मृत्यू दर रोखण्यात यश मिळविले आहे. आसाममध्ये 16 हजार रुग्ण असताना, केवळ 35 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू दर 0.22 टक्के एवढा आहे. केरळमध्ये 0.39 टक्के, तर ओडिशामध्ये 0.49 टक्के मृत्यू झाले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही मृत्यू दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. तेथे 2.56 टक्के मृत्यू दर आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोर कोरोना मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील कोरोना चाचण्या वाढत असल्याने रुग्णवाढ अपेक्षित असताना मृत्यू दर कमी करणे हे प्रमुख आव्हान असल्याचे स्पष्ट केले आहे.