Sat, May 30, 2020 13:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण; सरकार अध्यादेश काढणार!

मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण; सरकार अध्यादेश काढणार!

Last Updated: Feb 28 2020 2:45PM

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक 

 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत दिली आहे.

वाचा : ओबीसी स्वतंत्र जनगणनेवर विधानसभेत एकमताची 'वज्रमूठ'!

मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर कायदा तयार करून मुस्लिम आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुस्लिम आरक्षणाबाबत मागच्या सरकारचा अध्यादेश रद्द करण्याच्या आदेशामुळे त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. मात्र, आता अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रुपांतर करु, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

वाचा : 'न्यायालयाच्या ताशेऱ्यांनतर सरकारने 'सत्य' मारले'

भाजप-शिवसेना सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यात मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण आणण्याविषयी ठराव संमत केला होता. पण २०१४ च्यादरम्यान सत्तापालट झाला. सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला, पण मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मागे पडला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातच मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. शासकीय नोकरी, नोकरीतील बढती आणि शिक्षणसंधी यामध्ये हे आरक्षण देण्याचा विचार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आहे.