मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकाल लागून १५ दिवस होऊनही कोणत्याच पक्षाकडून किंवा आघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी आता पहिल्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. ११ नोव्हेंबरला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपचे विधिमंडळ गटनेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले.
दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केले असले, तरी बहुमताचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या निमंत्रणानंतर उद्या (ता.१०) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याचे सांगितले. भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा जादुई आकडा १४५ चा आहे.
त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचा (५६ जागा) पाठिंबा अनिवार्य आहे. मात्र उभय पक्षांमधील संबंध विकोपाला गेले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून चांगलेच घमासान रंगले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये उद्या काही घडामोडी घडणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता संपुष्टात येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवन गाठले आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिवसेनेवर तुफानी हल्ला चढवला.अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रतिहल्ला चढवत सांगितले की, भाजप खोटे बोलत आहे आणि खोट्यांशी मला चर्चा करायची नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.