Sat, Oct 24, 2020 23:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिवाळी नव्हे, पावसाळी अधिवेशन नागपुरात?

हिवाळी नव्हे, पावसाळी अधिवेशन नागपुरात?

Published On: Dec 20 2017 7:00PM | Last Updated: Dec 20 2017 7:00PM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी राज्यातील प्रश्‍नांवर चर्चा करण्यास अपुरा पडत असल्याने यापुढे हिवाळ्याऐवजी पावसाळ्यात किमान सहा आठवड्यांचे नागपूर अधिवेशन घेण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. यासंदर्भात सगळ्या पक्षांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सांगितले. आज सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन येत्या शुक्रवारी संपवण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

या अधिवेशनाचा कालावधी न वाढवल्याबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. मात्र, विरोधकांनी कामकाजात भाग घेतला नाही. कामकाजात भाग न घेता अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी हास्यास्पद असल्याचे बापट म्हणाले.

अधिक कालावधीसाठी नागपुरात अधिवेशन चालवायचे असेल, तर ते पावसाळ्यात घेतले जावे, असा विचार सुरू असून त्यावर येत्या मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्रश्‍नांवर अजून चर्चा झालेली नाही. शेतकर्‍यांच्या समस्यांवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे असताना सरकार नागपूरचे अधिवेशन गुंडाळण्याची घाई का करत आहे, असे विखे यांनी विचारले आहे.