Wed, Apr 01, 2020 23:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापोर्टल अखेर बंद; ठाकरे सरकारचा निर्णय

महापोर्टल अखेर बंद; ठाकरे सरकारचा निर्णय

Last Updated: Feb 21 2020 1:55AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देवेंद्र फडणवीस सरकारचे अनेक निर्णय रद्द करण्याचा सिलसिला सुरू ठेवत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अखेर शासकीय नोकर भरतीचे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला असून, सरकारी नोकरीच्या आशेवर असलेल्या लाखो तरुणांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेली 70 हजार रिक्त पदांची भरतीही आता या पोर्टलद्वारे होणार नाही.  

महापोर्टलद्वारे नोकरभरती करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा तक्रारी येत होत्या. ही परीक्षा ऑनलाईन घेतली जात असतानाही त्याचे गुण तत्काळ जाहीर केले जात नव्हते. शिवाय कोणाला किती गुण मिळाले याबाबतही माहिती उपलब्ध होत नसे. माहिती तंत्रज्ञानातील अधिकार्‍यांना हाताशी धरून गुणांत मोठा फेरबदल करून भरती केली जात असल्याचा आरोप होत होता. मागील दोन वर्षात राज्यभरात ठिकठिकाणी युवक वर्गाकडून आंदोलने करण्यात आली. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्ही सत्तेत आल्यास महापोर्टल बंद करू, असे आश्वासन दिले होते. अखेर आघाडी सरकारने महापोर्टल बंद करण्याचा शासन निर्णय गुरुवारी काढला.

70,000 जागांसाठी विभागीय स्तरावार परीक्षा

महापोर्टल बंद करण्यात येणार असल्याचे सुतोवाच मागील महिन्यातच मिळाले होते. सध्या राज्यात सरकारमधील 70 हजार रिक्त जागांच्या महाभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या सामान्य प्रशासन विभागाकडून आरक्षण तपासणीचे काम सुरू केले आहे. ही भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर विभागीय स्तरावर घेतली जाणार आहे.

फडणवीस सरकारचे हे निर्णय बदलले   

  महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी ‘एक वॉर्ड एक नगरसेवक’ पद्धत
  नगराध्यक्ष आणि सरपंचांची थेट जनतेतून होणारी निवड नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचा निर्णय
  कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुकीत शेतकर्‍यांना दिलेला मतदानाचा अधिकार रद्द
  सहकार आदी क्षेत्रात निवडलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द
  मेट्रो आरे कारशेडच्या कामाला स्थगिती
  मराठवाडा वॉटरग्रिड योजनेचा फेरआढावा
  जलयुक्त शिवार योजना मार्चमध्ये बंद करणार
  ऑनलाईन शिक्षक बदल्यांचे धोरण बदलण्यासाठी 

अभ्यास गट
  ग्रामविकास खात्यांतर्गत 25/15 ची आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांनाही स्थगिती