Thu, Jul 02, 2020 21:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरीवाल्यांवरून मनसे विरुद्ध सेना

फेरीवाल्यांवरून मनसे विरुद्ध सेना

Last Updated: Feb 14 2020 2:09AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील अनेक ठिकाणी जागा निवडून मार्किंग केले असून, त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. मुंबई महापालिकेने यावर तोडगा न काढल्यास मनसे फेरीवाल्यांविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसेने दिल्यामुळे मुंबई पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि मनसे यांच्यात आगामी काळात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. महापालिका फेरीवाला क्षेत्रात पदपथावर एक बाय एकच्या आकाराच्या जागा मार्किंग करण्यात येत असून, दादर, माहिम आणि जी/ नॉर्थ विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या 14 रस्त्यांवर 1 हजार 485 फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. यात मनसेचे मुख्यालय असलेल्या दादरच्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेरील पदपथाचाही समावेश आहे. पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्क्वेअर पदपथावर तब्बल 100 फेरीवाले बसवले जाणार असल्याचा निर्णय पालिकेने घेतला. आणि मनसेचे पित्त खवळले.

दादर : सत्ताधारी शिवसेनेने कुरघोडी केल्याचे लक्षात येताच मनसेने गुरुवारी नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली राजगड ते पालिकेच्या जी- नॉर्थ विभागावर मोर्चा काढला. रहिवासी भागात फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला दादरमधील नागरिकांचा विरोध आहे. असा निर्णय घेताना महापालिकेने रहिवाशांना विश्वासात घेतले पाहिजे पण तसे झालेले नाही. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन फेरीवाला धोरण राबवावे. पालिकेने रहिवाशांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास नागरिक व पालिकेत संघर्ष होईल, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला.

स्थानिक रहिवाशांनी फेरीवाला धोरणास तीव्र विरोध दर्शवला आहे. फेरीवाला धोरण अंमलबजावणी झाल्यास त्यामुळे निवासी परिसर बकाल होईल.  रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल. याशिवाय रहिवासी आणि फेरीवाले यांच्यात संघर्ष होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.