होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात निवडणुकांचे पडघम

राज्यात निवडणुकांचे पडघम

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:43AMमुंबई : खास प्रतिनिधी

एकीकडे मतदान कोणत्या पद्धतीने व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने चाचपणी सुरू केली असताना महाराष्ट्रातही निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे शिवसेनेनेही चाचपणी सुरू केली असून, लोकसभेच्या राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचे नक्‍की केल्याचे समजते. मुंबईतील उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आल्याचे सेनेतील सूत्रांनी सांगितले. 

राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचे जाहीर केले असले, तरी राज्यात ताकद वाढल्याचा दावा करीत आता लोकसभेच्या पन्‍नास टक्के जागांची मागणी करणारा प्रस्ताव काँग्रेसला दिल्याचे समजते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संंख्याबळ घटले होते, लोकसभेत राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचे अवघे दोन उमेदवार विजयी झाले, तर विधानसभेत काँगेेसचे 41 आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले. हाच धागा पकडून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद राज्यात समसमान झाल्याचे शरद पवार यांनी आधीही सूचित केले होते. आगामी निवडणुकीत जागावाटप करताना याचा विचार केला जावा, अशी भावना त्यांनी जाहीरपणे व्यक्‍त केली होती. त्यानुसार आता 2019 च्या निवडणुकीत 50-50 टक्के जागावाटप करावे, असे राष्ट्रवादीने काँग्रेेसला कळवले आहे. प्रदेश काँग्रेसकडून या सूत्राला विरोध होण्याची शक्यता आहे.   

शिवसेनेचे मिशन लोकसभा 

गेली चार वर्षे सत्तेत राहून भाजपला सतत शिव्याशाप देणार्‍या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे 48 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असून, त्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील खासदार-आमदारांसह नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी या दोन्ही मतदारसंघांतून उमेदवार देण्याबद्दल त्यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे समजते. गणेशोत्सवाच्या आधी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्याचा पक्षाचा विचार असल्याचे सेनेच्या एका नेत्याने सांगितले. 

शिवसेनेचे 18 खासदार असून, त्यापैकी काही जणांना यावेळी बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र, कोणाला बदलायचे, याचा निर्णय अजून झालेला नाही.