Sun, Sep 20, 2020 07:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १० लाख लोकांची गर्दी कोण आवरणार?

१० लाख लोकांची गर्दी कोण आवरणार?

Last Updated: Jul 03 2020 1:09AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार नसल्याची घोषणा करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंडळाच्या भूमिकेचे कौतुक केले असले तरी राजाची लहान तरी मूर्ती बसवा, असा आग्रह आता सर्व थरांतून होऊ लागला आहे. मात्र त्याकडे लक्ष न देता लालबाग राजा मंडळाचे पदाधिकारी यंदाच्या गणेशोत्सवाऐवजी आयोजित केलेल्या आरोग्य उत्सवाच्या तयारीला लागले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावर लालबागचा राजा मंडळाने यावर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार नसल्याची भूमिका घेत आरोग्य उत्सव साजरा कऱण्याची घोषणा केली. या आरोग्य उत्सवामध्ये गणेशाची मूर्ती न बसवता 10 दिवस रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा डोनेशनचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना काळात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांसह चीनशी सामना करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार आहे. मंडळाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक करत इतर मंडळांनी आदर्श घेण्याचे आवाहन केले. 

आरोग्य उत्सवाच्या तयारीला सुरूवात

आरोग्य उत्सवामध्ये रक्तदान शिबिरासह प्लाझ्मा डोनेशनच्या तयारीला मंडळाने सुरूवात केल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले. कांबळे म्हणाले की, प्लाझ्मा डोनेशनसाठी अनेक भक्तांकडून आत्ताच संपर्क साधण्यास सुरूवात झाली आहे. अनेक भक्त आणि त्यांच्या परिचित व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर मंडळाने मदत केली होती. त्याच भक्तांकडून आता प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढाकार घेतला जात आहे. याशिवाय रक्तदानासाठीही मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. म्हणूनच मंडळाने आत्ताच नियोजन सुरू केले असून लवकरच नोंदणी करत प्लाझ्मा डोनेशनद्वारे कोरोनाशी दोन हात केले जातील.

म्हणून छोट्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना नाही

लालबागचा राजा मंडळाच्या एका उच्चपदस्थ पदाधिकार्‍याने खाजगीत बोलताना सांगितले की, दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सव्वाकोटी भाविक येतात. इतक्या भाविकांचे नियोजन करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महापालिका, बेस्ट, पोलीस आणि इतर सामाजिक संस्थांचे कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तैनात असतात. हजारो कर्मचार्‍यांचा फौजफाटा असतानाही भाविकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते. याशिवाय लाखो भाविक राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरूनच दर्शन घेऊन जातात.

अशा परिस्थितीत चार फुटी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली, तर दरवर्षीच्या तुलनेत किमान 10 ते 20 टक्के भाविक राजाच्या दर्शनासाठी नियम झुगारून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परिणामी, 10 ते 20 लाख भाविकांचे नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांची नेमणूक करावी लागेल. कोरोनाचा सध्याचा प्रादुर्भाव पाहता एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांसह कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा, तसेच लाखो भाविकांचा जीव धोक्यात टाकणे योग्य ठरणार नाही. म्हणून मंडळाने मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे पत्र 

गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित करू नका, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला केले आहे. या काळात गणरायाच्या आशीर्वादाचीच आवश्यकता आहे, हे पाहता हा निर्णय समस्त गणेशभक्तांच्या दुःखात भर घालणारा असल्याचे हिंदू जनजागृती समितीने मंडळाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गणेशभक्त आणि राजामध्ये ताटातूट का करताय, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. परंपरा खंडित न करता लहान मूर्ती बसवावी आणि भक्‍तांना ऑनलाईन दर्शन घडवावे, अशी सूचना त्यांनी केली. 

 "