Tue, Aug 04, 2020 13:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपचार न मिळाल्याने राज्यात कोरोना बळींची संख्या वाढली!

उपचार न मिळाल्याने राज्यात कोरोना बळींची संख्या वाढली!

Last Updated: Jul 07 2020 1:33AM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील 73 टक्के कोरोनाचे मृत्यू हे मुंबई, ठाण्यासह एमएमआर रिजनमध्ये झाले असून सरकारी यंत्रणांमध्ये कुठेच समन्वय नसल्याने कोरोना महामारीची परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर जूनमध्ये 25 टक्क्यांनी मृत्यू वाढले आहेत. उपचार न मिळाल्यामुळेच मृत्यू संख्या वाढली, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. 

दिल्लीत कोरोनाच्या  चाचण्या वाढवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यात तेथील सरकारला यश आले आहे. परंतु राज्य सरकारकडून कोरोनाच्या चाचण्या कमी प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अहवालाची वाट पाहिली जाते. त्यातूनच त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.  सर्वाधिक चाचण्या केल्या जात असल्याचा दावा मुख्यमंत्री करीत आहेत, मग असे असतांना राज्य टेस्टिंगमध्ये नवव्या क्रमांकावर कसे, असा सवालही त्यांनी केला आहे. राज्यात कोरोना चाचण्या दोन-तीन पटीने वाढवून 24 तासात अहवाल देण्याची मागणीही फडणवीस यांनी केली. 

एमएमआर रिजनमधील महापालिकांसह ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये तीन दिवस जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मीरा-भाईंदरचा आढावा घेतल्यानंतर  त्यांनी भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर, ग्लोबल हब कोव्हिड हॉस्पीटल यांना भेटी दिल्या. महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, प्रसाद लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.

राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाण्यासह एमएमआर रिजनमधील आहेत. राज्यातील 73 टक्के मृत्यू हे एमएमआर रिजनमधील असून ठाणे जिल्ह्यातील अ‍ॅटिव्ह रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा अधिक झाली आहे. देशात रुग्ण वाढीचा दर 6.4 टक्के आहे. 

मात्र जूनमध्ये पनवेलमध्ये 364 टक्के, नवी मुंबई 190 टक्के, कल्याण-डोंबिवली 474 टक्के, मीरा-भाईंदर 413 टक्के, ठाणे 166 टक्के एवढा रुग्णवाढीचा दर प्रचंड आहे. असे असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार, महापालिका, आरोग्य यंत्रणेमध्ये कुठेच समन्वय दिसून आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.   

कोरोना संयशीतांना अहवाल येईपर्यंत कोव्हिड रुग्ण समजून उपचार करा, त्यातून मृत्यू दर कमी होईल. जूनमध्ये मृत्यू दरात 25 टक्क्यांनी वाढ झाली असून मोठ्याप्रमाणावर तपासणी न केल्यास मोठ्याप्रमाणावर मृत्यू होतील,अशी भीती व्यक्त केली. 

रुग्णालयांचे रॅकेट : महात्मा फुले योजनेमधून 1 लाख 22 हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र सध्या अ‍ॅक्टिव्ह आणि अत्यावश्यक रुग्णांची संख्याही एवढी नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांच्या संख्येबाबत शंका आहे. या निमित्ताने काही हॉस्पिटल्सकडून रॅकेट चालविले जाते का, याची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.