Tue, Aug 04, 2020 14:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली

अखेर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली

Last Updated: Jul 04 2020 1:12AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट तसेच इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जेईई परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात होणार आहे. जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणार असून जेईई ॲडव्हान्स परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. याशिवाय नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शुक्रवारी दिली. दर्जेदार शिक्षण तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले. 

याआधीच्या कार्यक्रमानुसार निट परीक्षा 26 जुलै रोजी होणार होती तर जेईई मेन परीक्षा 18 ते 23 जुलै या कालावधीत होणार होती. याशिवाय जेईई ॲडव्हान्स परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार होती.

नीट-२०२० साठी यंदा १५ लाख ९३ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट साठी नोंदणी केली होती. सामाजिक अंतर ठेवण्याच्या अटीचे पालन करण्यासाठी यंदाच्या परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट वाढवण्यात आली आहे. असे असतानाही कोरोना महारोगराईमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून केली जात होती.