Sat, Sep 19, 2020 08:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्नाळा बँक घोटाळा तपास सीआयडीकडे

कर्नाळा बँक घोटाळा तपास सीआयडीकडे

Last Updated: Jul 04 2020 12:49AM

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकनवी मुंबई : राजेंद्र पाटील

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 512 कोटी 54 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास पोलीस महासंचालकांनी गुरुवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचा आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या आदेशाने आता पुढचा तपास मुंबई सीआयडी पथकाकडे सोमवारी सोपवला जाण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याधिकारी यांच्यासह 75 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

फेबु्रवारीत पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा झाल्याची माहिती पनवेल भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांनी कागदपत्रांसह पत्रकार परिषदेत दिली होती. याप्रकरणी राज्य सरकारकडे आ. प्रशांत ठाकूर यांनी कारवाई करावी म्हणून लेखी मागणी केली होती. सराकरची भूमिका संशयस्पद असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर 13 फेबु्रवारीला संघर्ष समितीच्या वतीने  सहा हजार ठेवीदारांनी बँकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. खारघर येथील शाखेत ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन केले होते.

फेबु्रवारीअखेर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे सहकार खात्याच्या अहवालात 512 कोटी 56 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र हा घोटाळा 1 हजार कोटींचा असल्याचा दावा भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. यानंतर 552 कोटींची व्यक्तिगत मालमत्ता विकण्याची बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी तयारी दर्शवली होती. त्यातून खातेदारांचे पैसे देणार असल्याचे स्पष्ट केले होते. सहकार खात्याला व रिझर्व्ह बँकेला दिलेल्या पत्रात सर्व व्यक्तिगत मालमत्तांची यादी पाटील यांनी दिली होती. त्यामध्ये जमीन, घर, शेती, फ्लॉट्स, कर्नाळा स्पोर्ट्स क्‍लब व इतर मालमत्तेचा समावेश होता.

नवी मुंबई पोलिसांनी केलेला तपास पनवेल शहर पोलीस ठाण्यात 78/2020 गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास क्राईम ब्रँचकडे पोलीस आयुक्तांनी सोपवला. फेबु्रवारी ते 18 मार्चपर्यंत तपास करून एकूण 75 जणांवर ठपका ठेवला. त्यात बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्यधिकारी आणि 63 कर्जदारांचा समावेश आहे.

63 ओव्हर ड्राफ्ट खात्याचा तपास करून बँक खाते सील केले. अनेक खाती बोगस असल्याचे तपासात समोर आले. कर्जदारांची चौकशी केल्यानंतर आपण कर्ज घेतले नसल्याची माहिती तपास अधिकार्‍यांसमोर मांडण्यात आली. 2 जुलै रोजी पोलीस महासंचालकांकडून सदरचा गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश आले.

कर्नाळा बँकेत बेनामी खातेदारांच्या नावाने खाते उघडून यात करोडो रुपयांची कर्जरुपी रक्कम देऊन बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वळते केल्याचे लेखा अहवालात समोर आले आहे. कर्नाळा बँकेचा घोटाळा हा 1 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. यातील निम्म्या रकमेचा घोटाळा हा स्वत: विवेक पाटील यांनीच केल्याचा आरोप आ. ठाकूर यांना केला आहे. विवेक पाटील, संचालक मंडळ, मुख्याधिकारी  यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली आणि या खात्यात 513 कोटी रुपये कर्ज म्हणून वळवले, असेही त्यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई पोलिसांचा तपास जवळपास पूर्ण होत असताना अचानक हा तपास सीआयडीकडे दिला जातो, हे आर्श्‍चयकारक आहे. यातून ठेवीदारांना न्याय मिळेल असे मला वाटत नाही. केवळ निष्काळजीपणा आणि वेळकाढूपणाचे धोरण सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. सरकारच्या या दिरंगाईचा मी निषेध करतो.
प्रशांत ठाकूर, भाजप आमदार

 "