Tue, Jun 15, 2021 11:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीत निषेध मोर्चा; सौम्य लाठीमार

कल्याण-डोंबिवलीत निषेध मोर्चा; सौम्य लाठीमार

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 1:14AM

बुकमार्क करा
डोंबिवली/कल्याण : वार्ताहर

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत उमटले. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील भीम सैनिकांनी निषेध मोर्चा, रास्तारोको करीत उत्स्फूर्तपणे बंद पाळला. डोंबिवलीच्या शेलार नाक्यावर काही वाहने फोडण्यात आली. त्यामुळे पोलिसांना हल्लेखोर जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर कल्याणमध्ये रिक्षा आडवी लावून आंदोलकांनी एसटी बस फोडली. कल्याण पूर्व परिसरात आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी कोळसेवाडी, श्रीराम टॉकीज, पूना लिंक रोड या परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली. तर खडकपाडा येथील भीमसैनिक महिला मंडळाने दोषी समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी निषेध मोर्चा काढत कल्याणचे तहसीलदार अमित सानप निवेदन सादर केले.          

कल्याणच्या पत्रीपुलाजवळदेखील आंबेडकरी अनुयायांनी एकत्र जमून निषेधाच्या घोषणा दिल्या. सोमवारी मध्यरात्री कल्याणमध्ये एसटी बस फोडण्यात आली. वालधुनी सर्कलजवळ ही बस (एमएच 14 बीटी 3031) वळण घेत होती. इतक्यात या बसला आंदोलकांनी रिक्षा आडवी लावली आणि  हातात झेंडे, रॉड, दगड घेऊन आलेल्या 4-5 जणांच्या टोळक्याने या बसवर हल्ला चढवला. यात भगवान बुधवंत (53) या चालकासह एकजण जखमी झाला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्तिक जोंधळे (23) याला ताब्यात घेतले. तर त्याचा मित्र देवीदास काऊतकर याच्यासह अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.